भंगारयात्रा--

By Admin | Published: January 26, 2017 01:03 AM2017-01-26T01:03:38+5:302017-01-26T01:03:38+5:30

समाजभान

Breakage | भंगारयात्रा--

भंगारयात्रा--

googlenewsNext

शीर्षक वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल. भंगाराची कधी यात्रा भरते का? तर होय. भरते. जगाच्या पाठीवर १९५ स्वतंत्र, सार्वभौम देश आहेत. प्रत्येक देशाच्या चालीरीती, परंपरा, सण-समारंभ, जीवनशैली, भाषा वेगवेगळ्या आहेत. अनेक गोष्टी अशा असतात की, त्यामुळे ते त्या देशाचे वैशिष्ट्यच बनून जाते. परवा एका विवाह समारंभानिमित्त जर्मनीत एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणारे कोल्हापुरातील अमित चौगले भेटले. एका बॅँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे ते चिरंजीव. पाच वर्षे फ्रान्समध्ये नोकरी केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ते जर्मनीतील बर्लिनला गेले आहेत. ‘लोकमत’ने वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल कोल्हापूर’ या विशेषांकाच्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी जोडले गेले आहेत. साहजिकच त्यांच्याशी गप्पा झाल्या. गप्पांमध्ये भारत, फ्रान्स, जर्मनी तेथील जीवनशैली, चालीरीती, सण-समारंभ हा विषय निघाला. बोलता बोलता त्यांनी फ्रान्समधील ‘ब्रादरी फेअर’ची माहिती दिली. उत्तर फ्रान्समधील लिली या शहरात ही यात्रा वर्षातून एकदा भरते. काय असते या यात्रेत? तर शहरातील प्रत्येक घरांसमोर नको असलेल्या, अडगळीत टाकलेल्या वस्तू. त्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. तुम्ही तेथे जायचे. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू त्या घरच्या मालकाकडून विकत घ्यावयाच्या. या यात्रेत प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील नको असलेल्या वस्तू अशा पद्धतीने विक्रीसाठी ठेवत असल्याने संपूर्ण शहरालाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. यात्रा काळात आपल्याकडे जशा गावोगावच्या जत्रा, यात्रांमध्ये किंवा प्रदर्शनांमध्ये करमणुकीचे कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच या यात्रेतही केले जाते. स्वस्तात वस्तू मिळत असल्याने सुमारे अडीच लाख लोकवस्तीच्या शहरास यात्रा काळात २५ लाखांहून अधिक लोक भेट देतात.
आपल्याकडेही प्रत्येकाच्या घरात अडगळ असते. ती नको असलेल्या किंवा जुन्या, नादुरुस्त झालेल्या अनेक वस्तूंनी भरलेली असते. अडगळीतील या वस्तूंंचे आपण काय करतो. रस्त्यावर येणाऱ्या रद्दी किंवा भंगार विक्रेत्याला कवडीमोल भावाने देतो. किंवा कुणाला तरी फुकट देतो. मोटारसायकली, सायकली, अगदी चारचाकी वाहनेसुद्धा किलोच्या भावात दिली जातात. यातील सर्वच वस्तू निरुपयोगी नसतात. कपडे, फर्निचर, लोखंडी सामान किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू थोड्याफार दुरुस्तीनंतर पुन्हा वापरात येऊ शकतात. रद्दी किंवा भंगार विकत घेणारे या वस्तू जुन्या बाजारात विक्रीसाठी ठेवतात. अनेकदा भंगारात दुर्मीळ वस्तू, रद्दीत दुर्मीळ पुस्तके दिसतात. तुम्ही विकत घ्यायला गेलात तर नवीन वस्तूच्या निम्म्या किमतीत ती तुम्हाला देतात. वजनावर विकत घेतलेल्या वस्तूंची नगांवर विक्री होते. त्यात त्यांची चांगली कमाई होते. होऊ द्या, तो त्यांचा व्यवसाय आहे; पण आपले काय? अडगळीतील सर्वच वस्तूंची विल्हेवाट लावणे शक्य होते का? नाही. मग, अशी यात्रा आपल्याकडेही भरविली गेली, तर कल्पना अगदीच वाईट नाही. असे झाले तर घरातील अडगळ तर जाईलच शिवाय चांगला मोबदला मिळेल. मध्यस्थांची साखळी बंद होऊन थेट गरजवंत आणि वस्तूंचा मालक यांच्यात व्यवहार होऊन गरजूलाही स्वस्तात वस्तू मिळेल. एखादी गल्ली किंवा एखाद्या पेठेतून अशी सुरुवात करता येऊ शकते. फक्त त्याचे मार्केटिंग चांगले व्हायला हवे.
जाता जाता ‘भंगार’ या शब्दाचा अर्थ कन्नडमध्ये ‘सोने’ असा आहे. आपल्याकडेही ‘जुने ते सोने’ अशी एक म्हण आहे. त्यामुळेच या वस्तंूना ‘भंगार’ हे नाव पडले असावे.
- चंद्रकांत कित्तुरे


‘ङ्म’ङ्म‘ें३स्र१३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे

Web Title: Breakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.