कोल्हापूरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला शनिवारपासून ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:08 PM2018-12-21T17:08:20+5:302018-12-21T17:11:59+5:30
कोल्हापूर शहरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना शनिवारपासून ब्रेक लागणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : शहरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना शनिवारपासून ब्रेक लागणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, लक्ष्मीपुरी, शाहूपूरी या व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांना आता बोजा गुंंडाळावा लागणार असून त्यांना येथून पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
शहरातील मध्यवस्तीमधील बाजारपेठेत व्यापारी अवजड व लहान वाहनांतून माल आणतात. त्यामुळे विशेषत : लक्ष्मीपुरी ते उमा टॉकिज मार्गावर वाहतूकीची कोंडी होते. याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २१३ व्यापारी सभासद आहे.
या व्यापाऱ्यांचे मात्र; शहरात गोडावून आहेत. मालाची ने-आण शहरात होते. तासन् तास अवजड वाहने याठिकाणीच थांंबून असतात.यामुळे वाहतूक कोंडी होते. समितीने शाहू मार्केटयार्ड, टेंबलाईवाडी या ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिली असून सर्व मुलभूत सुविधा दिल्या आहेत; पण या जागेचा वापर व्यापारी करताना दिसत नाहीत.
यापुर्वीही व्यापाऱ्यांना टेंबलाईवाडी येथे जाण्यास पोलिस प्रशासनाने सांगितले होते. तरीही, व्यापारी येथून न गेल्याने शहरात अवजड वाहतूकीचा बोजवारा उडत आहे. या व्यापाऱ्यांना शनिवार अखेर अवजड वाहने शहरामध्ये न आणता टेंबलाईवाडीतील जागेत मालाची चढ-उतार करावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
बाजार समितीने या दिल्या सुविधा...
- आर्म गार्ड
- पोलिस चौकी
- पाणी, वीज सुविधा
- संरक्षक भिंती केल्या भक्कम
- विद्युत कनेक्शनसाठी समितीकडून तत्काळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’
बाजार समितीने आता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सात किंवा आठ जानेवारीपर्यत लक्ष्मीपुरीतील व्यापारी टेंबलाईवाडी येथे स्थलांतर होतील. पण ; केवळ अवजड वाहतूकीची कोंडी फक्त लक्ष्मीपुरीमुळे होते असे नाही. इतरत्र ठिकाणीही अवजड वाहनामुळे होते.
-वैभव सावर्डेकर,
माजी अध्यक्ष, लक्ष्मीपुरी ग्रेन मर्चंट असोसिएशन.
अवजड वाहतूकीबाबत शनिवारपासून प्रबोधन करणार आहे. १५ दिवस प्रायोगिक तत्वावर ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचना व हरकती लक्षात घेऊन याची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे.
-अनिल व्ही.गुजर,
पोलीस निरीक्षक , वाहतूक शाखा,कोल्हापूर.