पाॅकेटमनीतून काेराेना रुग्णांना नाश्ता, कोल्हापुरातील तरुणींचा आदर्श उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:44 AM2021-05-13T08:44:10+5:302021-05-13T08:44:51+5:30
कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
सचिन भोसले
कोल्हापूर : ‘त्या’ पाचहीजणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापैकी दोघीजणी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या. त्यावेळी त्यांनी रुग्णांसह कुटुंबीयांची होणारी पोटाची आबाळ पाहिली. इतर तीन मैत्रिणींशी चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला आणि सोमवारपासून सीपीआर परिसरात रोज सकाळी नाश्ता तयार करून देण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाॅकेट मनीतून होणारी ही मदत लाखमोलाची ठरत आहे.
कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्या दुधाळी हरिमंदिर परिसरातील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी श्रुती व अर्पिता सीपीआरमध्ये कोरोना लसीबाबत चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळचे कोरोना वॉर्डातील चित्र पाहून त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. दोघींनी श्रुतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रीण आचल कट्यारे आणि नेहा पाटील यांच्याशी चर्चा करून, सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. पालकांनी संसर्गाची भीती असल्याने जवळजवळ नकारच दर्शविला. मात्र पाचही जणींनी निर्णय बदलला नाही. आम्हाला पिझ्झा किंवा आईस्क्रिमसाठी पैसे देऊ नका. मात्र, या मदतीसाठी आर्थिक मदत करा, असे सांगितले. अखेरीस पालकांनी मदत करण्यास होकार दिला. सध्या त्या १०० लोकांना नाश्ता देत आहेत.
सर्वत्र कौतुक
श्रुती अहमदाबाद येथील युआयडीमधून डिझायनिंगमधील पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात आहे. अर्पिता ही विवेकानंद कॉलेजमध्ये बीबीए करीत आहे. श्रेया व तिची मैत्रीण आचल बारावीत आहेत, तर नेहा ही काॅम्प्युटर सायन्स करते.
कोरोनाच्या संकटात खारीचा वाटा म्हणून सीपीआरमधील रुग्ण आणि नातेवाईकांना सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरकरांनी दानशूर मंडळींना मदतीचा हात दिल्यास उपक्रम आणखी व्यापक करता येईल.
- श्रुती चौगुले, कोल्हापूर