गंजीमाळ येथे कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:26+5:302021-04-11T04:24:26+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून वाद वाढत गेला आणि एका राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून आतील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रकार ...

Breaking into the office at Ganjimal and vandalizing the literature | गंजीमाळ येथे कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

गंजीमाळ येथे कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

Next

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून वाद वाढत गेला आणि एका राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून आतील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी सायंकाळी टिंबर मार्केटमधील गंजीमाळ परिसरात घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून, एकूण आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंजीमाळ येथील बंडू प्रल्हाद लोंढे यांच्या मालकीच्या जागेत एका राजकीय पक्षाचे शाखा कार्यालय आहे. त्या परिसरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची उठबस आहे. शनिवारी सायंकाळी परिसरातून ओंकार जाधव, रोहित जाधव आणि अन्य चार-पाच जण दुचाकीचा सायलेन्सर काढून वेगाने पळवीत होते. त्यावेळी शंकर लोंढे यांनी त्यांना अडवून, रस्त्यात लहान मुले फिरतात. मोठ्याने आवाज करीत गाडी कशाला फिरवता असे विचारले. त्यावेळी त्या दोघांनी तू आम्हाला विचारणारा कोण, असा उलट प्रश्न विचारून शंकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी लोंढे यांच्या बंद कार्यालयाचा दरवाजा तोडून आतील एलसीडी, फॉल सिलिंग, दोन फॅन व इतर साहित्याची तोडफोड करून ५० हजारांचे नुकसान केले, तसेच कार्यालयातील चांदीची मूर्ती चोरून नेल्याचे बंडू लोंढे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून जुना राजवाडा पोलिसांनी ओंकार जाधव, रोहित जाधव (रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यासह अनोळखी पाच जणांवर गुन्हा नोंदविला.

दरम्यान, जखमी ओंकार विनोद जाधव (वय २४, रा. गंजीमाळ) याने पूर्ववैमनस्यातून आपल्यावर तिघांनी तलवारीने हल्ला करून जखमी केल्याची तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी बंडू लोंढे, शंकर लोंढे, विशाल लोंढे यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

फोटो नं. १००४२०२१-कोल-गंजीमाळ मारामारी०१

ओळ : कोल्हापुरात टिंबर मार्केटमधील गंजीमाळ येथे झालेल्या वादावादीतून एका राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयाचा दरवाजा फोडून आतील साहित्याची तोडफोड करण्यात आली.

फोटो नं. १००४२०२१-कोल-गंजीमाळ मारामारी०२

ओळ : गंजीमाळ येथील एका कार्यालयात हल्लेखोरांनी तोडफोड केलेले फर्निचर.

Web Title: Breaking into the office at Ganjimal and vandalizing the literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.