उद्यानांच्या दुरवस्थेने गुदमरतोय शहराचा श्वास

By Admin | Published: September 22, 2015 12:26 AM2015-09-22T00:26:00+5:302015-09-22T00:31:47+5:30

. उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे, पूर्णवेळ अधीक्षक, मनुष्यबळाची आवश्यकता

The breathless city breathed through the grief of the gardens | उद्यानांच्या दुरवस्थेने गुदमरतोय शहराचा श्वास

उद्यानांच्या दुरवस्थेने गुदमरतोय शहराचा श्वास

googlenewsNext

शहरात महापालिकेच्या हद्दीत लहान-मोठी अशी सुमारे ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. पर्यावरणाच्या आनुषंगाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची तितकीच गरज निर्माण झाली आहे. शहराची हद्दवाढ न झाल्याने सध्याच्या क्षेत्रातच वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे वातावरणाचा समतोल साधणे दिवसेंदिवस अवघड जात आहे. त्यामुळे आज शुद्ध हवा मिळणे मुश्कील होत आहे. त्यासाठी उद्यानांची संख्या, विविध वृक्षांची संख्या वाढविणे, तसेच वृक्षसंवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे, पूर्णवेळ अधीक्षक, मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

तानाजी पोवार -- कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेची हुतात्मा पार्क, महावीर उद्यान, रंकाळा उद्यान, शाहू उद्यान, सिद्धाळा उद्यान, सम्राटनगर उद्यान, कसबा बावडा येथील आंबेडकर उद्यान, आदी एकूण सुमारे ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. सर्वसाधारण ९० एकर क्षेत्रामध्ये या उद्यानांची व्याप्ती दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सर्व उद्याने भर मध्यवस्तीत असल्याने यांना विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा, लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी या उद्यानांना विशेष महत्त्व आहे. उद्यानाच्या दुरुस्ती-देखभालीवर प्रतिवर्षी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला जातो, तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे साडेपाच कोटी रुपये आस्थापना खर्च पडतो; पण उद्यान विकसित करण्यासाठी स्वतंत्र बजेटची सोय नसते, त्यासाठी महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातच तोकडी तरतूद केलेली आहे. या उद्यानामध्ये ट्रॅफिक आयलँड बगीचे १५ व शहरी वने १३ आहेत. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात आरक्षित असणाऱ्या २५ खुल्या जागा त्या-त्या नगरसेवकांनी उद्यानासाठी विकसित केले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात उद्यानासाठी तरतूद केलेल्या रकमेव्यतिरिक्त प्रभागांसाठी मिळणाऱ्या निधीतून या उद्यानांवर खर्च केला जातो. हा प्रभागवार उद्यानांवर पडणारा खर्चही तोकडाच आहे. या उद्यान विभागासाठी खर्चासाठी प्रतिवर्षी स्वतंत्र रकमेची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. उद्यान विभागामार्फत प्रतिवर्षी सुमारे ५० हजार नवीन झाडे संपूर्ण शहरात लावली जातात. १९७३ पासून १९९९-२००० पर्यंत एकूण सुमारे दहा लाख लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यात आलेले आहे.
शहरात सिमेंट काँक्रिटच्या वाढत्या इमारती, आय.आर.बी.ने शहरात केलेले काँक्रिटचे रस्ते त्यामुळे वातावरणात उष्म्याची कमालीची वाढ होत आहे. त्यासाठी वृक्षलागवडीमध्ये वाढ होणेही गरजेचे आहे. उद्यान आणि वृक्षांच्या कमतरतेने शहराचा श्वास गुदमरत चालला आहे.
ज्याप्रमाणे उद्यान विकसितची जबाबदारी उद्यान विभागावर असली तरी वृक्ष प्राधिकरणाचीही जबाबदारी याच विभागावर आहे. यासाठी नेमलेल्या कमिटीमार्फत शहरातील धोकादायक वृक्षांची, फांद्याची तोड करण्याचीही जबाबदारी याच विभागावर आहे. सिद्धाळा बागेमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र तीन खोल्यामध्ये गोष्टींच्या पुस्तकांची लायब्ररी व खेळणी संग्र्रहालय होते; पण ही लायब्ररी गेल्या आठ वर्षांत बंद पडली आहे. तसेच महावीर उद्यान येथील मत्स्यालय कबुतरखान्याकडेही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा विभागही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.


पूर्णवेळ अधीक्षकांची वानवा
उद्यान विभागाला नेहमीच पूर्णवेळ अधीक्षकांची वानवा आहे. यापूर्वी उदय सावंत यांनी चार वर्षे पूर्णवेळ अधीक्षक म्हणून काम पाहिले; पण गेल्या वर्षभरात उद्यान विभागाला ग्रहण लागले आहे. सध्या हे पद कंत्राटी पद्धतीवर भरले आहे. विशेष म्हणजे, या विभागाला पूर्णवेळ अधीक्षक नसल्याने विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे.
खर्च
या उद्यानांमध्ये असणाऱ्या सुमारे २१२ कर्मचाऱ्यांवर २०१४-१५ मध्ये वेतनासाठी सुमारे ५ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे, तर उद्यानावरील देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला आहे. उद्यानातील बेंच, लहान मुलांची खेळणी बदलण्यासाठी सुमारे ६१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या ६१ लाख रुपयांमध्ये प्रत्येक प्रभागासाठी सुमारे ७५ हजार रुपये देण्यात आले आहेत. या रकमेत खेळण्यांसह त्या-त्या प्रभागातील आरक्षित खुल्या जागा उद्यानासाठी विकसित करण्यासाठी, कंपौंड बांधणे, आदी कामे करण्यात आली आहेत.


काय करावे लागेल
शहरातील बहुतांश पुतळे एकत्रित एखाद्या उद्यानात बसवून ते ‘म्युझियम पार्क’ म्हणून विकसित करता येईल.
औषधी वनस्पतींची स्वतंत्र लागवड करून आॅक्सिजन पार्कची निर्मिती आवश्यक
शहरातील सर्वच उद्यानांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी पदपथ होणे गरजेचे
कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे
पूर्णवेळ उद्यान अधीक्षकांची नेमणूक करणे अत्यंत आवश्यक
महापालिका प्रशासनानेही उद्यान जतन करण्याकडे गांभीर्याने पाहावे.
त्या-त्या प्रभागांतील नगरसेवकाने परिसरातील उद्यानाकडे विकसित करण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वॉचमन की माळी
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या विचारात घेता सुमारे ५४ सार्वजनिक उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा कार्यभार अवघ्या २८ वॉचमनवर आहे. हे वॉचमनचे काम प्रतिदिन तीन पाळीत चालते. अपुऱ्या वॉचमनच्या संख्येमुळे माळी काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनाही वॉचमनची ड्यूटी बजावावी लागत आहे.

Web Title: The breathless city breathed through the grief of the gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.