लाचखोर मंडल अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात
By admin | Published: December 18, 2015 12:47 AM2015-12-18T00:47:22+5:302015-12-18T01:20:10+5:30
दाटे येथील प्रकार : जमीन एनए करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारली
चंदगड : जमीन एन. ए. (अकृषक) करण्यासाठी पंटराकरवी २५ हजार रुपयांची लाच घेताना नागनवाडी (ता. चंदगड) येथील सजाचे मंडल अधिकारी सुरेश शिवाजी बन्ने (मूळगाव माणगाव, ता. हातकणंगले) व पंटर परशराम जोतिबा आवडण
(रा. बेळेभाट, ता. चंदगड) यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. दाटे येथील तलाठी कार्यालयात ही कारवाई झाली.
दाटे येथील तक्रारदाराने काजू फॅक्टरी काढण्यासाठी ही जमीन अकृषक करण्याचा प्रस्ताव चंदगड तहसील कार्यालयात दिला होता; पण या प्रस्तावातील त्रुटी काढून देण्यासाठी तक्रारदार मंडल अधिकारी बन्ने यांना नागनवाडी कार्यालयात भेटले. यावेळी या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची मागणी बन्ने यांनी केली.
दरम्यान, तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केल्याने सापळा रचला. ठरलेली रक्कम देण्यासाठी मंडल अधिकारी बन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाटे येथील तलाठी कार्यालयातील आपला पंटर परशराम आवडण यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार ही रक्कम देण्यासाठी तक्रारदार आवडण यांच्याकडे गेले असता त्याला रंगेहात पकडण्यात आले.
मंडल अधिकारी बन्ने व पंटर आवडण यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चंदगड तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी माणगावचे मंडल अधिकारी विनायक आरगे व तुडयेचे तलाठी सुधाकर देसाई यांना लाचलुचपत विभागाने पकडले होते. दोन महिन्यांत महसूलच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना पकडले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन संकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, हवालदार मनोहर खणगावे, अमर भोसले, दयानंद कडूकर, मनोज खोत, आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)