विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी मागितली तीन हजाराची लाच, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:07 PM2021-12-01T18:07:40+5:302021-12-01T18:21:33+5:30
विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.
कोल्हापूर : विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना त्याच्या साथीदारास लाच लुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तर याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
खासगी साथीदार सौरभ अरविंद नर्ले (वय-24, रा.मु पो नेज, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे या लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुधीर अमितचंद चौधरी, (45, कनिष्ठ लिपिक, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय वर्ग-3) त्याचा खासगी साथीदार सचिन शिवाजी भोसले (रा. नेज, ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार नगरपंचायत हातकणंगले येथे विवाह नोंदणीसाठी अर्ज करणार होते. मात्र कोरोनामुळे हे काम ग्रामीण रुग्णालयातील चौधरी यांच्याकडे असल्याने त्यांनी त्यांच्याकडे अर्ज केला होता. हे काम पुर्ण न झाल्याने तक्रारदार पुन्हा चौधरी यांनी भेटले. यावेळी चौधरी यांनी त्यांना सचिन भोसले यांना भेटण्यास सांगितले. यावेळी भोसले यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे यांची तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी पडताळणी केली असता सुधीर चौधरी व सचिन भोसले यांनी लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले. तर सौरभ नेर्ले याच्या मदतीने त्यांनी ही लाच स्विकारल्याने या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप- अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संजीव बंबरगेकर, पो.ना विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ रुपेश माने यांनी केली.