स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हेमंत माने यांच्याविरोधात लाचेचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:21 AM2020-12-09T04:21:08+5:302020-12-09T04:21:08+5:30
आजरा : आजरा पंचायत समितीकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हेमंत पांडुरंग माने यांनी १४०० रुपयांची लाचेची मागणी केल्याने त्यांच्यावर आजरा ...
आजरा :
आजरा पंचायत समितीकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हेमंत पांडुरंग माने यांनी १४०० रुपयांची लाचेची मागणी केल्याने त्यांच्यावर आजरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. गजरगाव (ता. आजरा) येथील गटर बांधकाम, ग्रामपंचायत, इमारत दुरुस्ती व शाळेच्या मुतारीची स्वच्छता या कामासाठी लागणारी तांत्रिक मंजुरी मिळवून दिली म्हणून लाचेची मागणी केली. माने यांच्यावर लाचलुचपत विभागाने दोनवेळा लावलेला सापळा असफल ठरल्याने कारवाई बंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजरगाव (ता. आजरा) येथील तक्रारदार बांधकाम ठेकेदार यांनी गावातीलच आपल्या भावेश्वरी मजूर सहकारी संस्थेतर्फे गटर बांधकाम, ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती, शाळेच्या मुतारीची दुरूस्ती अशी कामे केली आहेत. या कामासाठी लागणारी तांत्रिक मंजुरी हेमंत माने यांनी मिळवून दिली. त्याच्या बक्षीसपोटी प्रत्येक कामाचे २०० रुपयेप्रमाणे एकूण १ हजार व दोन कामांचे मूल्यांकन करून बिल तयार करण्यासाठी ४०० रुपये अशी १४०० रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२० रोजी माने यांच्याविरुद्ध सापळा रचला होता, पण त्यादिवशी ते कार्यालयातच हजर नसल्याने तक्रारदारांची भेट झाली नाही. पुन्हा ११ नोव्हेंबर २०२० रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार व हेमंत माने यांची कार्यालयाबाहेर भेट झाली. परंतु, माने यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसांत माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, शरद पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, विष्णू गुरव यांनी केली.