Kolhapur: लाचखोर जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे याचा अहवाल क्रीडा संचालकांना पाठविला, निलंबन शक्य
By सचिन भोसले | Published: October 4, 2023 06:02 PM2023-10-04T18:02:15+5:302023-10-04T18:03:33+5:30
एक लाख १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात केली अटक
कोल्हापूर : एक लाख १० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अटकेत असलेले जिल्हा क्रीडाअधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे याच्यावरील कारवाईचा कार्यालयीन अहवाल क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी बुधवारी सायंकाळी क्रीडा आयुक्त डाॅ. सुहास दिवसे यांना पाठविला. त्यामुळे उद्या, गुरुवारी डाॅ. साखरे याचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
जिल्हा क्रीडाअधिकारी डाॅ. साखरे याच्यावर मंगळवारी (दि.३) रोजी क्रीडा कार्यालयास साहित्य पुरविणाऱ्या मक्तेदाराकडून निविदेच्या १५ टक्के रक्कमेपैकी १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना शिवाजी स्टेडीयम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबतचा अहवाल पाठविण्याची सुचना बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह पाच जिल्ह्याअंतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाली.
त्यानूसार क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी याबाबतचा अहवाल राज्याचे क्रीडा संचालक डाॅ. सुहास दिवसे यांना पाठविला आहे. त्यामुळे उद्या, गुरुवारी डाॅ. साखरे याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.