पगार न मिळाल्याने ब्रिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना घातले कोंडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:56 PM2020-03-03T17:56:45+5:302020-03-03T17:58:26+5:30
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ...
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मध्यवर्ती बसस्थानकातील कार्यालयात कोंडून घातले. थकीत पगार तत्काळ देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांना सोडून दिले.
राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राज्यातील सर्व आगार, बसस्थानकांच्या स्वच्छतेचा ठेका ‘ब्रिक्स’ या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीतर्फे कोल्हापूर विभागात साफसफाईसाठी १४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पगार अद्याप मिळाले नाहीत. याबाबत कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करून सुद्धा आज-उद्या मिळेल, अशी उत्तरे मिळत होती.
सर्वांनी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची भेट घेतली. यावेळी कंपनीतर्फे कोल्हापूर विभागातील साफसफाई कर्मचाऱ्यांचे पीएफ भरले आहे. मात्र त्यांना पगार दिला जात नाही. राज्य परिवहन महामंडळाने या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी केली. आंदोलनात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, हुपरी, कागल येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.