जरगनगरातील पुलाला भगदाड, रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:37 PM2020-09-09T19:37:10+5:302020-09-09T19:39:46+5:30
जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला.
कोल्हापूर : जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून शहरात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे लोंढे लागले होते. देवकर पाणंद, रामानंदनगर, नाळे कॉलनी, म्हाडा कॉलनी, विद्याविहार, सानेगुरुजीतील महादेवनगर या परिसरात अनेक घरांतून पाणी शिरले.
ज्योतिर्लिंग कॉलनी ते जरगनगर या रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मंगळवारच्या पावसामुळे मोठे भगदाड पडले. पाच फूट उंचीचे आठ मोठे नळे या पुलाखाली घालण्यात आले आहेत. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही झाडे उन्मळून पडली. ती या ओढ्यातून वाहत पुढे आली ती पुलाखालील नळ्यात अडकली. त्यामुळे पाण्याने आपला प्रवाह बदलला. पुलावरील रस्ता उखडला गेला. अनेक ओढ्या लागतच्या अनेक घरांत पाणी शिरले.
पुलाच्या बांधकामाचा पंचनामा मंगळवारच्या पावसाने केला. येथील नागरिकांनी दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्या मंगळवारच्या पावसाने खऱ्या ठरल्या. बुधवारी सकाळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह नगरसेविका गीता गुरव, नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी सदर पुलाची पाहणी केली. त्यावेळी तेथील नागरिकांनी पुलाच्या बांधकामाबाबत तीव्र आक्षेप घेतला. सध्या हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सातनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे जरगनगर ज्योतिर्लिंग कॉलनी रस्त्यावरील पुलाला भगदाड पडले, तसेच बाजूचा रस्ताही उखडला.