कासारी नदीवरील पूल जांभळी खोऱ्याला वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:23+5:302021-03-04T04:43:23+5:30
लोकमतचे परिसरामधून कौतुक! रवींद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव ; पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथील कासारी नदीवरील पुलामुळे जांभळी खोऱ्यातील ...
लोकमतचे परिसरामधून कौतुक!
रवींद्र पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव ; पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथील कासारी नदीवरील पुलामुळे जांभळी खोऱ्यातील पावसाळी हंगामातील वाहतुकीची समस्या कायमची मिटली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्यातील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासारी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर गावाच्या राजकीय वातावरणामुळे पुलाच्या भरावाचे काम खोळंबले होते. त्यामुळे वेळोवेळी लोकमतने या पुलासंदर्भात आवाज उठविला होता. मागील काही वर्षांपासून जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती. परंतु पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूल वारंवार पाण्याखाली जात होता. त्यामुळे मानवाड, वाशी, पिसात्री, आढाववाडी, खापणेवाडी, सावतवाडी, सुंभेवाडी व बाद्रेवाडी गावातील लोकांना वाहतुकीची समस्या कायम भेडसावत होती. त्यामुळे ही गरज ओळखून शासनाने पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर केला व पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाल्याने कासारी नदीवरील पूल वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे लोकमतचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
चौकटः
पावसाळी हंगामातील समस्या कायमची मिटली
पावसाळ्यात गरोदर माता व रुग्णांचे होणारे हाल ओळखून जांभळी खोऱ्याकडून कोल्हापूरकडे जाण्यासाठी पाटपन्हाळा-वाशी हा मार्ग जवळचा असल्याने पुलासंदर्भात वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे कासारी नदीवर पूल झाल्यामुळे पावसाळी हंगामात वाहतूक व रुग्णांना येणारा अडथळा दूर झाला आहे.
- प्रकाश दत्तात्रय पाटील
पंचायत समिती सदस्य, पाटपन्हाळा.
फोटो ओळ
पाटपन्हाळा - वाशी मार्गावरील नवीन पूल जांभळी खोऱ्याला वरदान ठरणार आहे .