उदगावच्या पुलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:55+5:302021-04-30T04:28:55+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात ...
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. आता हा ठराव राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. उदगाव येथे सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी व परत कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी असे दोन पूल आहेत. यातील एक पूल हा ब्रिटिशकालीन आहे. दुसरा पूल हा नवीनच बांधकाम झालेला आहे. ब्रिटिशकालीन पुलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्या अशी मागणी उदगावकरांची होती. उदगाव येथे शाहू महाराज यांचा वाडा, घोड्याच्या पागा, धान्याचे कोठार, घाट अशा शाहूकालीन वास्तू अस्तित्वात आहेत. शाहू महाराजांचे गावात वास्तव्य असल्याने पुलाला त्यांचे नाव असावे अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. १६ एप्रिलला झालेल्या बैठकीत या ठरावाला समाजकल्याण सभापती स्वाती सासणे सूचक असून शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, युवराज पाटील, अरुणराव इंगवले, राहुल आवाडे उपस्थित होते.
कोट - उदगावमध्ये असणारा पूल हा दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. त्या पुलाला शाहू महाराजांचे नाव देण्याचा ठराव झाला असून यापुढे जि. प. सर्वसाधारण सभा, सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यानंतर राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
- स्वाती सासणे, समाजकल्याण सभापती
फोटो - २९०४२०२१-जेएवाय-०२-उदगाव येथील ब्रिटिशकालीन पूल.(छाया-अजित चौगुले, उदगाव)