गडहिंग्लजमध्ये पूल, बंधारे अद्यापही पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:45+5:302021-07-25T04:21:45+5:30
मुसळधार पाऊस आणि चित्री व आंबेओहोळ धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून तालुक्यातील सर्व बंधारे ...
मुसळधार पाऊस आणि चित्री व आंबेओहोळ धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठावरील २० गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांना जनावरांसह स्थलांतरित करावे लागले आहे. .
शनिवारी, पाऊस थांबला असला तरी पूर ओसरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पूर्व भागासह आजरा, चंदगड तालुक्यांशी असलेला संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे.
चंदगड मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली असून, आजऱ्याचा व्हिक्टोरिया पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सायंकाळी गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
दरम्यान, महापूर गिजवणे जॅकवेलचे विद्युत जनित्र पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे व काही नगरसेवकांकडून शहरात पिण्याचे पाणी टँकरद्वारे मोफत दिले जात आहे.
चौकट : ७,६४३ नागरिकांचे स्थलांतर !
गडहिंग्लज शहरासह
तालुक्यातील २० गावांना महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे एकूण १,७४३ कुटुंबांतील ७,६४३ नागरिक आणि ३,७३५ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ४९ घरांची पडझड झाली आहे.