पुलाचे तीन पिलर कोसळले
By admin | Published: December 24, 2014 10:44 PM2014-12-24T22:44:37+5:302014-12-25T00:08:15+5:30
मुरगूड-कुरणी पूल धोकादायक : पाटबंधारे खात्याचे पूर्णपणे दुर्लक्षित
अनिल पाटील- मुरगूड शहरातून कागल कुरणी भडगाव, मळगे, आदी गावांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या मुरगूड कुरणी रस्त्यावरील वेदगंगा नदीवर असणाऱ्या पुलाचे तीन पिलर ढासळल्याने या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे धोकादायक बनली असून, गेले कित्येक वर्षांपासून पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे.
निपणी कणकवली राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या रस्त्यावरील वाहनांना कागलकडे जायचे असल्यास वाहनधारक सर्रास या मार्गाचाच वापर करतात तसेच कुरणी, चौंडाळ, सावर्डे, भडगाव, मळग,े आदी दहा ते पंधरा गावातील हजारो ग्रामस्थ विद्यार्थी दररोज याच पुलावरून सायकल, मोटारसायकल, चारचाकी कारद्वारे ये-जा करीत असतात. तसेच साखर कारखाने सुरू झालेल्या काळात काही उसाने भरलेले ट्रॅक्टर्स याच पुलावरून ये-जा करतात.
वेदगंगा नदीवर असणारा पूल वजा बंधारा हा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित आहे. या बंधाऱ्याला १०० वर्षे झाली आहेत; पण किरकोळ दुरुस्ती वगळता याकडे पाटबंधारे खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दोन वर्षांपूर्वी पुलाचे पूर्वेकडील बाजूला असणारे कुरणी गावाकडील बाजूचे सलगचे तीन पिलर कोसळले आहेत. हे पिलर्स अर्ध्याहून खाली कोसळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या संपूर्ण पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात या अवस्थेतच त्याठिकाणी बरगे घातले जातात; पण त्यातूनही प्रचंड वेगाच्या दाबाने पाणी वाहते. पुलावरील रस्ता तर अक्षरश: खड्ड्यांची चाळण झाली आहे. काही ठिकाणी अर्धाएक फुटांपर्यंत खोल खड्डे पडले आहेत. याबाबत विचारणा झाल्यास पाटबंधारे खात्याकडून जुजबी उपाय केले जातात. मुरूम टाकून पुलावरील खड्डे मुजविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला आहे.
पुलाचा पिलर ढासळण्यास सुरुवात झाली त्यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूला खात्याकडून हा पूल ‘अवजड वाहतुकीस धोकादायक’, असे दोन बोर्ड लावले गेले आहेत; पण गेल्या दोन वर्षांत पाटबंधारे खात्याने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही, याबाबत वाहनधारकांतूक संताप व्यक्त होत आहे.