संक्षिप्त वृत्त-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:30 AM2021-08-18T04:30:05+5:302021-08-18T04:30:05+5:30
कोल्हापूर : डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या डाक जीवन विमा’ (पीएलआय) या सुविधेला १३७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ...
कोल्हापूर : डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या डाक जीवन विमा’ (पीएलआय) या सुविधेला १३७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त २४ तारखेला विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी सुविधेच्या माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमी प्रीमीयम अधिक बोनस, प्राप्तीकरातून सूट, पहिल्या हप्त्याचा आगाऊ भरणा, पासबुक, परिवर्तन, पुनरुज्जीवन ही या विम्याची वैशिष्ट्ये आहेत शिवाय एसएमएस, ई-मेल, ऑनलाईन पेमेंट या सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केंद्र व राज्य सरकारी, शासकीय, निम शासकीय कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, सल्लागार, पदवीधर तसेच राष्ट्रीय शेअर बाजार, अनुसूचित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे
---
मध केंद्र योजनेचा लाभ घ्या
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून जिल्ह्यातील युवकांनी तसेच संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. डी. कुरुंदवाडे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती याबाबत माहिती दिली जाते. लाभार्थी निवड प्रकियेंतर्गत प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी बंधपत्र लिहून देणे व प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन येथे संपर्क साधावा.
--
ऑनलाईन जॉबफेअर
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन केले आहे. त्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, विमा प्रतिनिधी, एचबीएम ऑपरेटर, टर्नर, मशिनिष्ट, फिटर इलेक्ट्रीक ॲन्ड मेकॅनिक, डिप्लोमा, बीई, डाटा प्रोसेसिंग असोशिएट, टेलीको-ऑर्डिनेटर,हेल्पर अशी ५ वी ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, बीई ,आयटीआय या शैक्षणिक पात्रतेची जिल्ह्यातील ८ आस्थापनांनी ६५० पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
हा मेळावा फक्त ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यासाठी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवारांना उद्योजकांच्या सोयीनुसार २५ ऑगस्टला मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसव्दारे अथवा दूरध्वनीद्वारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल.
----