संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:08+5:302021-05-17T04:24:08+5:30
इंगळी :श्री सिद्धगिरी मठ, टी.एल.सी.कोल्हापूर, वेद इंडस्ट्रीज हातकणंगले व ग्रामपंचायत इंगळी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मोफत आरोग्य तपासणी ...
इंगळी :श्री सिद्धगिरी मठ, टी.एल.सी.कोल्हापूर, वेद इंडस्ट्रीज हातकणंगले व ग्रामपंचायत इंगळी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये येणाऱ्या नागरिकांची सिद्धगिरी मठातील डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून कोरोनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मठावरील रोगप्रतिकारक काढा व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
...........
कबनुरात पोलिसांचा फौजफाटा
कबनूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चालू असलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कबनूर गावामध्ये येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कबनूरमध्ये सर्वत्र रस्ते सुनसान झाले.
.......
आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा
कबनूर: ग्रामपंचायतीच्या कामगारांकडून कामाचे नियोजन करून घेण्यासाठी नेमलेले मुकादम अनिल हेगडे हे कामगारांशी उद्धटपणे वागत आहेत. मुकादमवर कारवाई व्हावी, असे तोंडी व लेखी यापूर्वी ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने मंगळवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.