संक्षिप्त वृत्त-जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:26+5:302021-09-16T04:30:26+5:30
कोल्हापूर : तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्काच्या संरक्षणांतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स ...
कोल्हापूर : तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्काच्या संरक्षणांतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स या वेबसाइटवर अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाइटवर आपली सर्व माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयामार्फत पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी बुधवारी दिली.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (फक्त मुली), दहावी परीक्षा फी, गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या माहितीसह जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर कार्यालयाच्या वतीने तालुक्यात घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---