संक्षिप्त बातम्या गडहिंग्लज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:11+5:302021-02-12T04:23:11+5:30
नेसरी : सलाम मुंबई फौंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या विद्यामंदिर हेळेवाडी (ता. ...
नेसरी : सलाम मुंबई फौंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या विद्यामंदिर हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या शाळेच्या प्रथमेश जयवंत सुतार याची निवड झाली आहे. या परिषदेत प्रामुख्याने तंबाखूमुक्त शाळा हा विषय घेऊन काम चालू आहे. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, स्वमत व्यक्त करणे, निर्भीडपणे बोलणे, व्यसनाधिनतेसारख्या समस्येबाबत जागरूक करणे या सर्व बाबी संवादाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करणे असणार आहेत. बालपरिषदेच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती करणे, आरोग्यविषयक चांगल्या सवयी वृद्धिंगत व्हाव्यात, या अनुषंगाने परिषदेची आखणी करण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत या ऑनलाईन सत्रांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थी व मार्गदर्शक यात सहभागी घेणार आहेत. यासाठी शाळेतील शिक्षक लक्ष्मीकांत नाईक यांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका यल्लूताई नाईक, शाळा व्यवस्थापन समिती हेळेवाडी यांचे सहकार्य लाभले.
* प्रथमेश सुतार : ११०२२०२१-गड-०४
--------------------------
२) मलिग्रे येथे रुग्णवाहिका, बेड लोकार्पण सोहळा
पेरणोली : मलिग्रे (ता. आजरा) येथील प्राथमिक रुग्णालयाला महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या कोविड-१९ अंतर्गत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते रुग्णवाहिका व १५ बेड प्रदान करण्यात आले. जि. प. सदस्या सुनीता रेडेकर यांच्या पाठपुराव्याने व आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने कोळिंद्रे जि. प. मतदार संघात प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे व वाटंगी येथे दोन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या. त्याचबरोबर रेडेकर यांनी आपल्या जि. प. फंडातून १५ बेड मंजूर केले. त्यांचेही लोकार्पण आज करण्यात आले. डॉ. अनिल देशपांडे, डॉ. रवींद्र गुरव, डॉ. कौसर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपसभापती वर्षा बागडी, आदित्य रेडेकर, मलिग्रेचे माजी सरपंच समीर पारदे, सुरेश पाटील, युवराज जाधव, प्रकाश पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.