बिद्रीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:19 PM2017-10-10T15:19:16+5:302017-10-10T15:19:38+5:30
कोल्हापूर, दि. १0 : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सुरु झाली असून सलामीलाच राष्ट्रवादी - भाजपच्या आघाडीने राखीव गटातील तीन जागा जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादी भाजप आघाडीचे संस्था गटातील उमेदवार जगदीश पाटील यांचा ५२ मताने विजयी झाल्याचा पहिला निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.
दुपारपर्यंत लागलेल्या निकालातून या आघाडीची घोडदौड सुरूच असून दोन जागा जिंकल्यानंतर इतर मागास प्रवगार्तून युवराज वारके हे ४८८३ मतांनी विजयी झाले आहेत. युवराज वारके यांना २५८०१ मते मिळाली. तर शिवसेना--कॉग्रेस आघाडीच्या बाजीराव गोधडे यांना २०९१८ मते मिळाली. ६०२ मते अवैध ठरली.
राष्ट्रवादी-भाजप आघडीतील कुरुपलीच्या अर्चना पाटील, निढोरीच्या निता राणे, वाळवे खुर्दचे जगदीश पाटील विजयी झाले आहेत. भाजप-राष्ट्रवादीने आपली विजयाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. युवराज वारके हे मागास प्रवगार्तील उमेदवार आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी - भाजपच्या आघाडीने पहिली जागा जिंकल्यानंतर गट क्र. ६ 'अनुसूचित जमाती'मधून याच आघाडीच्या प्रदीप शिवाजी पाटील यांनी शिवसेना-कॉंग्रेसच्या श्यामराव भोई यांच्यावर ४००८ मतांनी विजय मिळविला. पाटील यांना २५३३४ तर भोई यांना २१३२६ मते मिळाली. ६६४ मते अवैध ठरली. सलग तिसरी जागा जिंकत राष्ट्रवादी - भाजप आघाडीने वर्चस्व राखले आहे.
अत्यंत चुरशीच्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची मतमोजणी परिसरात प्रचंड गर्दी आहे.