कामगार विमा रुग्णालय पूर्ववत एमआयडीसीत आणा
By admin | Published: August 13, 2016 11:46 PM2016-08-13T23:46:46+5:302016-08-14T00:24:13+5:30
चंद्रकांत पाटील : कृष्णा व्हॅली चेंबर आंदोलनाच्या तयारीत
कुपवाड : राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) चे रुग्णालय कुपवाड शहरामध्ये होते. परंतु, कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या वर्षभरापासून हे रुग्णालय अधिकाऱ्यांनी मिरजेत स्थलांतरित केले आहे. त्यामुळे सुविधांअभावी कामगार व उद्योजकांचे हाल होत असून त्वरित हे रुग्णालय कुपवाड एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करावे. अन्यथा आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही, असा इशारा कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
कृष्णा व्हॅली चेंबर ही संघटना औद्योगिक बाबींशी संलग्न आहे. कारखानदार आणि सरकारी कार्यालये यामधील दुवा आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाविषयी राज्य कामगार विमा महामंडळाकडे लेखी व जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत तोंडी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. परंतु विमा महामंडळाचे वैद्यकीय अधिकारी जुजबी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि उद्योजकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा उद्योग अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. वास्तविक या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक हजार आस्थापना आहेत. त्यांच्याकडून एक दिवसाचाही विलंब न लावता दंडासह रक्कम वसुली केली जाते. मात्र, त्यांच्या कामगारांना सुविधा दिल्या जात नाहीत.
सध्या हे रुग्णालय परिसरात नसल्यामुळे अनेक कामगारांचे हाल होऊ लागले आहेत. काही कर्मचाऱ्यांना अपंगत्व आले आहे. कामगारांच्या आरोग्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कामगारांच्या या समस्यांवर तातडीने विचारविनिमय करून निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत शासनाकडून कोणतेही निर्णय घेण्यात येत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुविधांअभावी कामगारांचे हाल होत असून त्वरित हे रुग्णालय कुपवाड एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)
कामगारांना अपमानास्पद वागणूक
राज्य कामगार विमा महामंडळाकडून नियुक्त केलेल्या काही रुग्णालयांतून कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याठिकाणी कामगारांना भीती दाखविण्याचे काम केले जाते. त्या खासगी रुग्णालयात कामगारांचे हित साधले जात नाही. या त्रस्त कामगारांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, असे साकडे कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ईएसआयसीच्या मुंबईतील आयुक्तांंना घालण्यात आले आहे.