रेडी पंचक्रोशीत नवीन प्रकल्प आणा

By admin | Published: November 15, 2015 09:29 PM2015-11-15T21:29:39+5:302015-11-15T23:56:16+5:30

कामगारांची मागणी : दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले; टाटा मेटॅलिक्स प्रकल्प पुन्हा सुरू करा

Bring a new Panchkrishita project | रेडी पंचक्रोशीत नवीन प्रकल्प आणा

रेडी पंचक्रोशीत नवीन प्रकल्प आणा

Next

शिरोडा : रेडी येथील बंद अवस्थेत असलेल्या टाटा मेटॅलिक्स प्रकल्पाच्या जागी स्थानिक कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध होईल, असा एखादा प्रकल्प आणावा किंवा टाटा मेटॅलिक्स प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा, यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न व्हावेत. जेणेकरून रेडी पंचक्रोशीत स्थानिक कामगारांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे टाटा मेटॅलिक्सच्या बेकार झालेल्या कामगारांनी केली आहे. पालकमंत्री केसरकर शिरोडा दौऱ्यावर आले असता याबाबतचे निवेदन देण्यात आले.माजी केंद्रीय अर्थमंत्री मधू दंडवते यांच्या प्रयत्नाने १९९० मध्ये जिल्ह्यातील रेडी गावात उषा इस्पात नावाने पीग आयर्न प्रकल्प आणला गेला. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळेल, आपल्या भागाचा विकास होईल, या विचाराने गावातील जमीनदारांनी अल्प मोबदल्यात आपल्या जमिनी प्रकल्प सुरू करण्यासाठी दिल्या. प्रकल्प सुरू झाल्यावर स्थानिक १५०० जणांना कायमस्वरूपी, तर ५०० जणांना कंत्राटी स्वरूपाचे काम मिळाले. साधारण १४ वर्षे अनेक समस्यांना तोंड देत हा प्रकल्प सुरू होता. परंतु कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रकल्प बंद पडून २००५ मध्ये याचा लिलाव करण्यात आला. लिलावात हा प्रकल्प कोलकात्यातील नामांकित मे. टाटा मेटॅलिक्स लिमिटेडने खरेदी केला. उषा कंपनीची सर्व मालमत्ता या कंपनीने घेतली. पण सर्व कामगारांना कामावर न घेता काही कामगारांनाच पुन्हा नव्याने कमी पगारावर कामावर ठेवले. उषा कंपनीकडून काहीच नुकसानभरपाई न मिळाल्याने व सर्वांनाच काम न मिळाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तरीही गावच्या विकासाच्या अपेक्षेने स्थानिक कामगार व नेत्यांनी फारसा विरोध केला नाही. २००५ ते ११ या कालावधीत टाटा कंपनीने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला; पण कच्च्या मालाचा तुटवडा, राज्य शासनाची न मिळालेली परवानगी आणि तत्कालीन राज्य सरकारची उदासीनता यामुळे प्रकल्पाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी होऊन अखेर मार्च २०१३ मध्ये कामगारांना नाममात्र नुकसानभरपाई देऊन प्रकल्प बंद केला. यामुळे पुन्हा एकदा सर्वांवर बेकारीचे संकट आले.
हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची सुतरामही शक्यता नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेला कामगारवर्ग शेतकऱ्यांप्रमाणे कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा; अन्यथा दुसरा कोणताही प्रकल्प सिंधुदुर्गात येण्यासाठी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र व गोवा सीमेवर टाटा मेटॅलिक्सच्या मोकळ्या जागेत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत असल्याबाबत बातमीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर शिरोडा शिवसेना शाखेत आले होते. यावेळी त्यांनी टाटा मेटॅलिक्सच्या जागेवर सामान्य कामगारांनाही रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प येणार असून, लवकरच प्रकल्प सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, प्रकाश परब, तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शाखाप्रमुख रोहित परब, विलास रगजी, राजन गावडे, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, सरपंच विशाखा परब, विभागप्रमुख सचिन परब, संतोष मांजरेकर व शिवसैनिक उपस्थित होते.

लवकरच निर्णय घेऊ: सुभाष देसाई
टाटा मेटॅलिक्सच्या बेकार कामगारांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प आणण्याबाबत तसेच रेडी येथील टाटा मेटॅलिक्सच्या मोकळ्या जागेत प्रकल्प सुरू करण्याबाबत शासन गंभीर आहे. आपण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात याबाबत बैठका-चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Bring a new Panchkrishita project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.