‘काळम्मावाडी’तून पाणी आणू
By admin | Published: November 4, 2014 12:58 AM2014-11-04T00:58:58+5:302014-11-04T01:04:01+5:30
हाळवणकर : ‘आयजीएम ’ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय
इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना राबविण्याबरोबर आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.
शहरात विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्याबरोबरच विकास-कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पालिकेच्या सभागृहामध्ये विशेष बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, मुख्याधिकारी सुनील पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, बांधकाम सभापती महेश ठोके, आरोग्य सभापती चंद्रकांत शेळके, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींसह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला आमदार हाळवणकर म्हणाले, मला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता माझ्याकडून नगरपालिकेची व लोकांच्या हिताची शासन दरबारी असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करीत आहे. वैयक्तिक मान-सन्मान यात न पडता आपण जनतेच्या हिताची कामे करूया. म्हणूनच पुढाकार घेऊन मी या बैठकीचे आयोजन केले आहे.
बैठकीत काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाबाबत बोलताना हाळवणकर यांनी, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाचा पाठपुरावा करून केंद्र व राज्य सरकारमार्फत शंभर टक्के अनुदानाने ही योजना पूर्ण करून घेण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर आयजीएम रुग्णालयाकडे असलेले ३५० खाटांचा दवाखाना पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील नागरी सेवा-सुविधांची विविध कामे वेळेवर पूर्ण होण्यासाठी नागरिकांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. नगरविकासाच्या रेंगाळलेल्या प्रारुप विकास आराखड्यातील क्लिष्ट पद्धती सोपी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचेसुद्धा या बैठकीत ठरविण्यात आले.
शेवटी नगराध्यक्षा बिरंजे यांनी आभार मानून या बैठकीचा समारोप केला. (प्रतिनिधी)