भामट्याकडून सव्वा किलो सोने जप्त वृद्धांना गंडा : ३८ गुन्हे उघडकीस; इचलकरंजी पोलिसांची कारवाई

By admin | Published: May 11, 2014 12:20 AM2014-05-11T00:20:46+5:302014-05-11T00:20:46+5:30

इचलकरंजी : पेन्शन बँकेत जमा झाली आहे, ती मिळवून देतो, अशी बतावणी करून वयोवृद्धांना फसवून त्यांची लुबाडणूक करणार्‍या दस्तगीर गुलाब

Bringing a kilo of gold from a bribe to the elderly: 38 criminals exposed; Ichalkaranji police action | भामट्याकडून सव्वा किलो सोने जप्त वृद्धांना गंडा : ३८ गुन्हे उघडकीस; इचलकरंजी पोलिसांची कारवाई

भामट्याकडून सव्वा किलो सोने जप्त वृद्धांना गंडा : ३८ गुन्हे उघडकीस; इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Next

इचलकरंजी : पेन्शन बँकेत जमा झाली आहे, ती मिळवून देतो, अशी बतावणी करून वयोवृद्धांना फसवून त्यांची लुबाडणूक करणार्‍या दस्तगीर गुलाब शेख (वय ३६, रा. सदर बाजार, कोल्हापूर) यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील एकूण ३८ गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून ३० लाख रुपये किमतीचे सुमारे सव्वा किलो सोने जप्त केले आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी आज (शनिवार) पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील व त्यांची पत्नी हे दोघेजण कºहाड येथील नातेवाइकांकडे जाण्यासाठी ३ मे रोजी इचलकरंजीत आले होते. बसस्थानकात त्यांना गाठून दस्तगीर शेख याने पेन्शनच्या बहाण्याने रामगोंडा पाटील यांना मोटारसायकलवर बसवून स्टेशन रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ नेऊन सोडले व पुन्हा बसस्थानकात येऊन रामगोंडा पाटील यांच्या पत्नीस बॅँकेत सही लागणार आहे, दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करून त्यांच्याकडील दागिने लांबविले. या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल सावंत व जमादार हे दोघेही शेख याच्या पाळतीवर होते. घटना घडल्यानंतर दोन दिवस बनावट दागिने परिधान करून वृद्धांच्या मदतीने संबंधित भामट्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नव्हते. अखेर दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर एस.टी.तून उतरताना शेखला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपण केलेल्या गुन्ह्णांचा पाढा वाचला. कोल्हापुरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, कुरुंदवाड, वडगाव, शिरोळ, मुरगूड, गांधीनगर, हुपरी, भुदरगड, कोडोली, कागल, करवीर, आजरा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, आदी विविध ठिकाणी ३८ हून अधिक फसवणुकीचे प्रकार केल्याचे त्याने सांगितले. फसवणुकीतून लंपास केलेले सुमारे ३० लाख रुपये किमतीचे एक किलो १२० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. शेख याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्याच्याकडून या गुन्ह्णात वापरलेली मोटारसायकलही जप्त केल्याचे मकानदार यांनी सांगितले. शेख हा फळविक्रीचा व्यवसाय करीत होता. कोल्हापुरातून येऊन वृद्धांना गाठून त्यांना लुबाडण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेखने सोने वितळवून त्याच्या लड्या बनविल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात एखाद्या सराफाचा सहभाग आहे. शेख याच्याकडून पेन्शनच्या बतावणीखाली फसवणूक झालेल्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Bringing a kilo of gold from a bribe to the elderly: 38 criminals exposed; Ichalkaranji police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.