'ब्रिस्क', कारखान्याची संयुक्त बैठक बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:36+5:302021-04-02T04:24:36+5:30
गडहिंग्लज : सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांसंदर्भातील चर्चेसाठी कारखाना प्रशासन आणि ब्रिस्क कंपनी यांची संयुक्त बैठक बुधवारी (दि. ७) येथील ...
गडहिंग्लज : सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांसंदर्भातील चर्चेसाठी कारखाना प्रशासन आणि ब्रिस्क कंपनी यांची संयुक्त बैठक बुधवारी (दि. ७) येथील प्रांत कार्यालयात बोलवावी, अशी मागणी सेवानिवृत्त साखर कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, ब्रिस्क कंपनीकडून सेवानिवृत्तांच्या थकीत रकमेपैकी ५० टक्के म्हणजे ७५ लाख रुपये २० फेब्रुवारीला मिळाले आहेत; परंतु, कारखाना प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३२ कामगारांच्या ४८ लाखांपैकी संपूर्ण रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्याबाबत कारखान्याकडून कामगारांची दिशाभूल सुरू आहे.
दरम्यान, सहकार खात्याच्या सचिवांनी १० एप्रिलपर्यंत कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देणीच्या मुद्द्याचा नव्या करारात समावेश होणे आवश्यक आहे.
गेल्या ७८ दिवसांपासून सेवानिवृत्त कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कारखान्याकडून वेळेत देणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजित देसाई, लक्ष्मण देवार्डे व महादेव मांगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.