जमिनीबाबतचे ब्रिटिशकालीन कायदे अधिवेशनात बदलणार

By admin | Published: September 11, 2016 12:45 AM2016-09-11T00:45:33+5:302016-09-11T00:48:11+5:30

चंद्रकांतदादा पाटील : पन्हाळा उपविभागीय इमारतीचे उद्घाटन

The British laws on land will change in the session | जमिनीबाबतचे ब्रिटिशकालीन कायदे अधिवेशनात बदलणार

जमिनीबाबतचे ब्रिटिशकालीन कायदे अधिवेशनात बदलणार

Next

पन्हाळा : शेतकऱ्यांशी सर्वांत जास्त संबंधित महसूल विभाग असून, महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद सोडवून दिले पाहिजेत. यासाठी जमिनी संबंधित ब्रिटिशकालीन कायदे बदलण्यासाठी प्रयत्नशील असून, डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात महसूलचे १० कायदे असतील. यासाठी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व आपण स्वत: प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उपविभागीय अधिकारी कार्यालय पन्हाळाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, नगराध्यक्ष असिफ मोकाशी, पंचायत समिती सभापती सुनिता पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र खाडे, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या क्षेत्राबाहेर अनियंत्रित विकास सुरू आहे. त्याला नियंत्रित करून नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ब्रिटिशकालीन कायदे बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात महसूल विभागाचे १० कायदे असतील. जनतेच्या सोईसाठी सात-बारा आॅनलाईन देणे सुरू असून, यामध्ये काही ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी हाती सातबारा देण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, पन्हाळ्याचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी पन्हाळा व परिसरातील गावांचा स्वतंत्र विकास आराखडा होणे आवश्यक असून, विकास आराखड्यात जनतेला विश्वासात घेणे आवश्यक आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, अधिकार जास्त असलेल्या महसूल विभागाचे सक्षमीकरणही अधिक होणे आवश्यक आहे. नवीन तालुक्यांची पुनर्रचना करताना जनता आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. तसेच नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत व्यायामशाळा सुरू झाल्यास आमदार फंडातून साहित्य खरेदीसाठी १० लाखांचा निधी देऊ, असे स्पष्ट केले.
आमदार चंद्रदीप नरके यांनी नवीन सुसज्ज इमारतीतून लोकांच्या कामाचा निपटाराही जलद व्हावा, असे सांगून पन्हाळ्याला येण्यासाठी एकच रस्ता आहे. यावर दरडी कोसळू लागल्यास प्रमुख रस्ता बंद होईल. त्यामुळे दुसरा रस्ता तातडीने मंजूर करावा, दुर्ग संवर्धनात पन्हाळा आणि गगनगड यांचा समावेश असावा, अशी मागणी केली.
आमदार सत्यजित पाटील म्हणाले, प्रशासकीय इमारत दर्जेदार असणे, कार्यसंस्कृती व कार्यक्षमता या दोहोंच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगून महसूल खात्याला प्रत्येक गावात चांगल्या चावडीची आवश्यकता आहे. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद असल्याने विकास आराखडा तयार करून पर्यटनाला चालना द्यावी, मंडल रचनेची पुनर्रचना व्हावी, महसूल विभागातील रिक्त जागा भराव्यात.
प्रास्ताविक रवींद्र खाडे यांनी केले. स्वागत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी केले, तर आभार उपविभागीय अधिकारी सुचेता शिंदे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The British laws on land will change in the session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.