सांस्कृतिक दहशतवाद रोखण्यास व्यापक चळवळ
By admin | Published: March 25, 2015 12:37 AM2015-03-25T00:37:00+5:302015-03-25T00:39:41+5:30
मूलनिवासी संघाचा परिसंवाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर : मेघा पानसरे
कोल्हापूर : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि त्याचे आचरण हाच सांस्कृतिक दहशतवादाला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे़ यासाठी पुरोगामी संघटना आणि डाव्या पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर आधारित व्यापक चळवळ उभारणे हीच डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोेविंद पानसरे यांच्या हौतात्म्याला खरी सलामी ठरेल, असा सूर ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने व जबाबदाऱ्या’ या परिसंवादात निघाला़ मूलनिवासी संघातर्फेकोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सोमवारी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ प्रभाकर निसर्गंध होते़
प्रा़ मेघा पानसरे म्हणाल्या, भाजपचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर गोविंद पानसरे यांनी नथुराम गोडसे प्रवृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेण्याचे तंत्र अवलंबले होते़ या धर्मांध आणि सनातनी शक्तीची काळी बाजू थेट मांडली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती़ हल्ला होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशीही त्यांनी गोडसे प्रवृत्तीचा गांधीजींच्या खुनावरून खरपूस समाचार घेतला होता़ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पुरोगामी विचारांच्या प्रसाराचा वैचारिक ठेवा संपविण्यासाठी धर्मांध शक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला़
पानसरे म्हणाल्या, डॉ़ दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़; पण प्रबोधनाची ही लढाई अखंडित सुरू ठेवण्यासाठी निर्भीडपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे़
डॉ़ शरद गायकवाड म्हणाले, चार्वाक ते पानसरेंच्या हत्येच्या इतिहासाला विकृत मनुवृत्तीची झालर आहे़ सत्ताधाऱ्यांना मारेकरी माहीत आहेत; पण त्यांना ते शोधायचे नाहीत़ त्यामुळे ही लढाई पुरोगामी आणि प्रतिगामी अशी असून ही लढाई जिंकण्यासाठी बुद्धाची शांती आणि भीमाची क्रांती यावर आधारित संघर्षाची गरज आहे़
डॉ़ राजेंद्र कुंभार म्हणाले, सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद समजून घेतला पाहिजे़
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, दलित महासंघाचे लाला नाईक, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वायदंडे, संभाजी कांबळे, रघुनाथ मांडरे, बाळासाहेब भोसले, आदींची भाषणे झाली़