तोडली युती हीच तुमची झूटनीती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:45 PM2023-07-15T12:45:00+5:302023-07-15T12:45:23+5:30
सभा शिवसेनेची आणि गुणगान मात्र भाजपचेच
कोल्हापूर : राज्यात २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूल भूमिका घेतली होती, त्यासाठी तुम्हाला ५० कॉल केले परंतु तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही हा कद्रूपणा ही तर तुमची झूटनीती होती, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला. हा एकनाथ शिंदे घरात बसणारा नाही. नालेसफाईची पाहणी करणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
येथील पेटाळा मैदानावर हा मेळावा झाला. त्यास पाऊस येऊनही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी रक्त सांडले आहे. घरांवर तुळशीपत्र ठेवून तुम्ही हजारो केसेस अंगावर घेतल्या म्हणून शिवसेना वाढली आहे. त्यामुळे सत्तेसाठी तडजोड करणार नाही, असे बजावून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपली युती स्वार्थासाठी नव्हे, वैचारिक आहे. ही आपली भावनिक युती आहे. ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही खुर्चीसाठी युती केली. बाळासाहेबांनी शिकवले अन्याय सहन करू नका. सरकार आपले असतानाही निधी मिळत नव्हता. कशासाठी सरकार, कशासाठी सत्ता हा प्रश्न होता; पण आता सत्ता आपली आहे. हे सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे सरकार आहे. एका वर्षात इतके मोठे धाडसी निर्णय घेणारे सरकार लोकप्रिय झाले. निधी मागितला की केंद्रातून पैसे दिले जातात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पाठबळ मोठे आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राजेश क्षीरसागर यांनी मेळाव्यामागील भूमिका सांगितली. मेळाव्यास जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने क्षीरसागर यांनी चांगलेच शक्तिप्रदर्शन केले.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनीच मुख्यमंत्री शिंदे यांना मोठे पाठबळ दिल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आगामी २०२४ पर्यंतच्या सर्व निवडणुका या मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जातील.
अजित पवार आलेत म्हणून चिंता नको..
आता अजित पवार आलेत कसं होणार याची चिंता करू नको. काही गणितं करावा लागतात पण यात तुमच्यावर अन्याय तर होणार नाहीच शिवाय शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला तसेच यापुढे तिन्ही पक्षांचा मिळून एकत्रित मेळावा होणार असल्याचे जाहीर केले.
ठाकरें यांचा जीव महापालिकेत..
भाजप-शिवसेना युती २०१४ ला होऊ शकली नाही कारण आपल्या लोकांना विश्वास नव्हता. आपण कसे वागतोय याचे आत्मपरीक्षण करायला हवे. मुंबई महापालिका निकालावेळी भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली होती. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, की पण आमच्या नेत्याचा जीव महापालिकेत आहे. शिवसेनेला बिनविरोध द्या. माझ्या एका ‘शब्दा’वर त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला दिली व महापौर निवड बिनविरोध केली; परंतु त्यांनी त्याची कुठेही वाच्च्यता केली नाही.
उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार
देवेंद्र फडणवीस हे २०१८ मध्येच शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायला तयार होते; पण ते एकनाथ शिंदे यांना द्यावे लागणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ते घेतले नाही, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
देवेंद्र यांचा जपच..
या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात दर दोन वाक्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख आला होता. सभा शिवसेनेची आणि गुणगान मात्र भाजपचेच असे चित्र सभास्थळी होते.