अल्पवयीन मुलीसह दलाल गायब!
By Admin | Published: June 29, 2015 12:21 AM2015-06-29T00:21:53+5:302015-06-29T00:21:53+5:30
पोलिसांना झटका : चौकशीसाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती
सांगली : येथील गोकुळनगरजवळील संजय गांधी झोपडपट्टीत पश्चिम बंगालमधील एका १२ वर्षाच्या मुलीसह सापडलेला ‘तो’ दलाल एका रात्रीत या मुलीसह गायब झाला आहे. पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र पोलिसांना झटका देत खोलीला कुलूप घालून तो पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
शनिवारी रात्री झोपडपट्टीतील नागरिकांनी या दलालास पकडून त्याच्या ताब्यातून १२ वर्षाच्या मुलीची सुटका केली होती. दलालास चोप देऊन त्यास विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी या भागातील नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पोलिसांसमोर दलालाने ही मुलगी त्याची पुतणी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी यासंदर्भातील पुरावे सादर करण्यास त्यास सांगितले होते. रविवारी सकाळी पुरावे देतो, असे सांगून त्याने तेथून स्वत:ची सुटका करवून घेतली होती. पोलिसांनी या मुलीस सुरक्षिततेसाठी स्वत:च्या ताब्यात न ठेवता पुन्हा दलालाच्याच ताब्यात दिले. दलालास सोडून देताना मोबाईलवर त्याचे साधे छायाचित्रही घेतले नाही. तो सकाळी येईल, या आशेवर पोलीस होते. मात्र तो खोलीला कुलूप ठोकून मुलीस घेऊन रात्रीत गायब झाला.
विश्रामबाग पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पत्की यांनी दुपारी पोलीस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणाची सर्व माहिती घेतली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्टीतील रहिवाशांकडेही चौकशी केली.
तेथील काही नागरिकांनी, हा दलाल पश्चिम बंगालमधील मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी करीत होता, असे सांगितले, तर काहींनी तो चांगला माणूस आहे, अशी माहिती दिली.
त्यानुसार या नागरिकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पण हा दलाल सापडला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. दिवसभर चौकशीचे कामकाज सुरू होते, मात्र त्याचा सुगावा लागू शकला नाही. (प्रतिनिधी)
तस्करीत दोघे सक्रिय
मुलीसह पळून गेलेल्या दलालाचा आणखी एक साथीदार मुलींच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली. पण यासंदर्भात आम्हाला काहीच माहिती नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. हे दोन्ही दलाल कोण? त्यांचा झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन राहण्याचा काय उद्देश? याची चौकशी होण्याची गरज आहे.
अक्षम्य हलगर्जीपणा
वेश्यावस्तीनजीक एका अल्पवयीन मुलीसह परप्रांतीय व्यक्ती आढळते आणि पोलीस अक्षरश: डोळे झाकून त्याच्यावर ‘विश्वास’ ठेवून संबंधित मुलीला त्याच्याकडेच सोपवून बाहेर पडतात, यासारखा मोठा हलगर्जीपणा नाही. हा हलगर्जीपणाच की ‘आणखी काही?’ याबाबतही गांभीर्याने चौकशी होण्याची गरज आहे.