बाजार समितीत आज गूळ सौदे बंदच राहणार-: हमालीवाढीचे त्रांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:19 AM2019-11-18T11:19:07+5:302019-11-18T11:21:36+5:30
समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज, सोमवारी गुळाचे सौदे बंदच राहणार आहेत. हमाल व खरेदीदार यांच्यात हमालीवाढीवरून त्रांगडे झाले असून, आमदार विनय कोरे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही घटक आपापल्या भूमिकांवर ताठर राहिल्याने पेच निर्माण झाला आहे.
हमालीत १० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी हमाल व खरेदीदार यांच्यात वाद सुरू आहे. यावर गेली तीन-चार दिवस चर्चा सुरू असतानाच शनिवारी (दि. १६) दुपारी हमालांनी काम बंद केले. त्यानंतर प्रकरण चिघळत गेले आणि आता चर्चाच करायची नाही, असा सूर खरेदीदारांनी आळवला. समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. त्यानीही शाहूपुरी मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम खाडे, अतुल शहा; तर हमालांचे प्रतिनिधी बाबूराव खोत यांच्याशी चर्चा केली; तरीही ते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने रविवारी यावर तोडगा निघालाच नाही.
शनिवारची आवक मार्केट यार्डातच पडून असल्याने आज, सोमवारी खरेदीदारांची गूळ खरेदी करण्याची मानसिकता नाही; तर १० टक्के हमालीवाढीचे परिपत्रक काढले तरच काम सुरू करू, अशी भूमिका हमालांनी घेतल्याने सोमवारी सौदेच बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या प्रशासनाने घेतला आहे.
दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण ते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने आज, सोमवारी सौदे होणार नाहीत; त्यामुळे शेतकऱ्यांनी गुळाची आवक करू नये.
- बाबासाहेब लाड (सभापती, बाजार समिती)
करारानुसार १० टक्के वाढ देणार नसाल तर आता १५ टक्के द्या, पुढील तीन वर्षे दरवाढ मागत नाही. एवढीच आमची मागणी आहे. महापुरामुळे गावाकडे अगोदरच नुकसान झाले. आम्हाला दरवाढ नको, मदत म्हणून हा निर्णय घ्या, एवढीच विनंती आहे.
- बाबूराव खोत (हमाल प्रतिनिधी)