आघाड्यांची भेळमिसळ

By admin | Published: February 7, 2017 01:12 AM2017-02-07T01:12:51+5:302017-02-07T01:12:51+5:30

जिल्हा परिषद : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानीने पाहिली सोय, सेना स्वतंत्र

Brood of fronts | आघाड्यांची भेळमिसळ

आघाड्यांची भेळमिसळ

Next

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी सोमवारी सोयीनुसार आघाड्या केल्या. खानापुरात तर दोन्ही काँग्रेसने चिन्हच गोठविले आहे. भाजपनेही खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात काही जागांवर चिन्ह गोठवून आघाडीच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वाळव्यात विकास आघाडीपासून काँग्रेसने फारकत घेतली, तर शिवसेना जिल्ह्यात स्वबळावर लढणार आहे.
सोमवारी जोरदार राजकीय घाडमोडी घडल्या. आटपाडीचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी रविवारी रात्री राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म घेतले, मात्र सोमवारी सकाळी ते भाजपमध्ये दाखल झाले. ‘दुष्काळी फोरम’चा अखेरचा मोहरा भाजपने ‘हायजॅक’ केला. आटपाडीत एकाकी पडल्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात सन्नाटा पसरला होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाळवा तालुक्यातील ४८ गावे, खानापूर आणि शिराळा तालुक्यात आघाडी केल्याचे जाहीर केले. तेथील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागा समसमान वाटून घेतल्या आहेत. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितराव घोरपडे गट अशी आघाडी करण्यात आली, तर मिरज पश्चिममध्ये केवळ काँग्रेस व खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी झाली. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ जागांपैकी भोसे, एरंडोली, बेडग, कवलापूर, बुधगाव, कसबे डिग्रज या जागा काँग्रेसला, म्हैसाळ राष्ट्रवादीला, कवठेपिरान, समडोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, तर मालगाव घोरपडेंच्या स्वाभिमानी विकास आघाडीला आणि आरगची जागा स्थानिक विकास आघाडीला देण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या २२ जागांपैकी काँग्रेसकडे सोनी, भोसे, एरंडोली, सलगरे, बामणोली, कवलापूर, बुधगाव, कसबेडिग्रज, कवठेपिरान, समडोळी, इनामधामणी, टाकळी, म्हैसाळ, राष्ट्रवादीकडे नरवाड, बेडग, स्थानिक आघाडीला खटाव, आरग, नांद्रे आणि स्वाभिमानी विकास आघाडीकडे गुंडेवाडी ही जागा देण्यात आली. भाजपने मात्र मिरज तालुक्यात सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. येथील मदनभाऊ गटाच्या जयश्रीताई पाटील आणि वसंतदादा गटाचे विशाल पाटील यांच्यातील वाद मिटला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये आघाडी केली आहे. शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. कोकरुड आणि पणुंब्रेतर्फ वारुण काँग्रेसला, तर मांगले आणि वाकुर्डे बुदुक्र जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याविरोधात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, माजी सभापती उदयसिंग नाईक यांनी आघाडी केली आहे.
वाळवा तालुक्यातील बोरगाव, बागणी आणि रेठरेहरणाक्ष या तीन जिल्हा परिषद गटात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कारंदवाडी, बोरगाव, कामेरी, रेठरेहरणाक्ष, चिकुर्डे, येलूर, बहादूरवाडी आणि वाळवा गणातही काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चारही जागी राष्ट्रवादीतील आ. सुमनताई पाटील यांचा आर. आर. आबा गट, सगरे गट आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची आघाडी झाली आहे. आबा-सगरे गट आणि घोरपडे गटाला प्रत्येकी दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागांचे वाटप निश्चित झाले. तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी आहे. भाजपकडेही कार्यकर्त्यांची उणीव असल्याने भाजप-काँग्रेसने आघाडी करून जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही निम्मे-निम्मे जागावाटप केले आहे.
जत तालुक्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचा वसंतदादा आघाडी गट राष्ट्रवादीबरोबर आहे. जनसुराज्यने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. संख जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समितीच्या जागा जनसुराज्यला देण्यात आल्या आहेत.
पलूस-कडेगाव तालुक्यात काँग्रेसविरोधात भाजपने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. (प्रतिनिधी)


तासगावात भाजप एबी फॉर्मविना
तासगावमधील सावळज आणि मांजर्डे जिल्हा परिषद गटांसह सहा पंचायत समितीच्या गणात भाजपने उमेदवारांना एबी फॉर्मच दिले नसल्याचे स्पष्ट झाले. एबी फॉर्मवरून भाजप-राष्ट्रवादीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
काँग्रेसचे अशोक मोहिते राष्ट्रवादीत
मिरज पंचायत समितीचे काँग्रेसचे सदस्य अशोक मोहिते (हरिपूर) यांनी काँग्रेसकडे समडोळी पंचायत समिती गणातून उमेदवारी मागितली होती. डॉ. पतंगराव कदम गटाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी हरिपुरातील संजय सावंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मोहिते यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. प्रदेशाध्यक्षांनी फॅक्सद्वारे मोहिते यांना उमेदवारी देण्याचे आदेश दिले. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, आदेशाची मूळ प्रत मागितली. ती नसल्याने मोहिते यांची काँग्रेसची उमेदवारी हुकली. मात्र त्यांना राष्ट्रवादीने तत्पूर्वीच एबी फॉर्म दिला होता, तो जमा केल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले.

Web Title: Brood of fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.