Kolhapur: कौटुंबिक वादातून पाचगावात सख्ख्या भावाचा निर्घृण खून, रागाच्या भरात कुटुंबाची वाताहत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:29 PM2024-08-21T12:29:17+5:302024-08-21T12:29:48+5:30
दुचाकीच्या चेन कव्हरने डोक्यात हल्ला, हल्लेखोर अटकेत
कोल्हापूर: कौटुंबिक वादातून पाचगाव येथील पोवार कॉलनीत मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दुचाकीच्या चेन कव्हरने हल्ला करून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सागर जयसिंग कुंभार (वय ३२) असे मृताचे नाव असून, हल्लेखोर वैभव जयसिंग कुंभार (वय ३६, दोघे रा. पोवार कॉलनी, पाचगाव) याला करवीर पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी वैभव कुंभार हा सार्वजनिक बांधकाम विभागात अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी करतो. कामात हलगर्जीपणा केल्यामुळे काही दिवसांसाठी त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. दारूच्या व्यसनामुळे दोन्ही भावांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. चार दिवसांपूर्वी वाद झाल्याने मुलांना वैतागलेली आई माहेरी गेली होती. तर सोमवारी वैभव याची पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली. मंगळवारी दुपारी घरात दोघा भावांमध्ये वाद झाला.
त्यावेळी वैभवने घराबाहेर लावलेल्या दुचाकीचे चेन कव्हर काढून ते सागरच्या डोक्यात घातले. वर्मी घाव लागल्याने सागर गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला. शेजाऱ्यांना मारहाणीचा प्रकार लक्षात येतात त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी करवीर पोलिसांना कळवले.
पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक युनूस इनामदार, हवालदार विजय कळसकर यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. तसेच हल्लेखोर वैभव कुंभार याला ताब्यात घेतले आहे. त्याने भावाचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीर उपविभागाचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. खून झाल्याचे समजताच पोवार कॉलनीत बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला.
रागाच्या भरात कुटुंबाची वाताहत
सागर कुंभार हा शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि आई असा परिवार आहे. दोघे भाऊ रागाच्या भरात अनेकदा एकमेकांशी भांडत होते. या रागानेच कुंभार कुटुंबाचा घात केला.