भावा, फुटबॉल जिंकला पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:36 AM2019-02-11T00:36:51+5:302019-02-11T00:36:55+5:30
कोल्हापूर : पाच वर्षांनंतर प्रथमच पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ ...
कोल्हापूर : पाच वर्षांनंतर प्रथमच पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आज, सोमवारी दुपारी चार वाजता विजेतेपदासाठी शाहू मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत; तर मैदानाबाहेर सामन्यांत लिंबू, बाटल्या फेकाफेकी करू नये म्हणून ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी सोशल मीडियावरून ‘हार-जित कोणत्याही संघाची होऊ दे; मात्र, कोल्हापूरचा फुटबॉल जिंकला पाहिजे,’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे या सामन्याला भावनिक किनार मिळाली आहे.
पाटाकडील तालीम मंडळाने गेल्या चार वर्षांत अपवादवगळता सर्वच स्पर्धांचे विजेतेपद पटकावत कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या त्यांच्या अश्वमेघात प्रथमच शिवाजी तरुण मंडळ पाच वर्षांनंतर त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत पाटाकडील ‘अ’ संघाने क्रीडारसिकांना वेगवान व आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले आहे. ‘शिवाजी’चा संघही आक्रमक व चिवट असून त्यांनी यावेळी अंतिम सामन्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे आज, सोमवारी कोल्हापूरकरांना ईर्षा, चुरस आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ पाहण्यास मिळणार आहे.
पाटाकडील ‘अ’च्या हृषिकेश मेथे-पाटील याने या स्पर्धेत एकूण आठ गोलची नोंद केली आहे; तर ‘शिवाजी’कडून संदीप पोवारने दोन गोलची नोंद केली आहे.
आजच्या सामन्यात खिलाडूवृत्तीचा खेळ पाहण्यास मिळावा. लिंबू, बाटल्या फेकू नये व शिवीगाळ, पंचांवर अश्लील शेरेबाजी करू नये. ज्येष्ठांनी शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यास येणे बंद केले आहे. त्यांनीही पुन्हा मैदानावर यावे, असे चांगले वातावरण निर्माण करूया, असे भावनिक आवाहन आजी-माजी फुटबॉलपटूंनी केले आहे.
गुणसंख्या अशी
‘पीटीएम ‘अ’ संघाने नऊ गुण मिळवून अव्वल ठरत अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाजी तरुण मंडळाने साखळी फेरीतून एका सामन्यात विजय, एका सामन्यात पराजय व एक सामना बरोबरीत अशा चार गुणांसह अंतिम फेरीत धडक मारली आहे.