दारू पिऊन मारणाऱ्या भावाचा इचलकरंजीत डोक्यात दगड घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:24 AM2018-10-19T10:24:45+5:302018-10-19T12:25:20+5:30
इचलकरंजी येथील लंगोटे मळ्यात थोरल्या भावाने धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. दारू पिऊन मारत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मध्यरात्री घडली घटना पहाटे उघडकीस आली.
कोल्हापूर : इचलकरंजी येथील लंगोटे मळ्यात थोरल्या भावाने धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. दारू पिऊन मारत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मध्यरात्री घडली घटना पहाटे उघडकीस आली.
नितीन सुभाष मगदूम (वय 32, रा लंगोटे मळा, चिंदके शाळेजवळ, इचलकरंजी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली असून, पोलिसांनी मारेकरी भाऊ सचिन सुभाष मगदूम (36, रेणुकानगर यड्राव, ता शिरोळ) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नितीन हा दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मारत होता. काल (18) रात्री पुन्हा नितीन व त्याची पत्नी सुमन यांच्यात जोरदार वाद झाला, त्यावेळी नितीनने घरातील भांडीकुंडी विस्कटून सुमन यांना मारहाण केली. त्यावेळी भाऊ सचिन हा तेथे आला त्याने नितीनला जाब विचारला. त्यामुळे दोघांच्यात जोरदार भांडण झाले.
मारेकरी सचिन सुभाष मगदूम
त्यानंतर सचिनने नितीन याला घरातून बाहेर नेले आणि लंगोटे मळा येथे अग्रवाल याच्या घरासमोर गेल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. ही घटना मध्यरात्री दिड वाजता घडली. घटनेनंतर सचिन तेथून निघून गेला.
पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीवरून तात्काळ हालचाली गतिमान करून मारेकरी सचिन याला ताब्यात घेतले.