कौलव जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:12+5:302021-03-04T04:43:12+5:30

शिरगाव : जिल्हा परिषद निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी असला तरी कौलव मतदारसंघात आतापासून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. इच्छुकांनी ...

Brotherhood of aspirants in Kaulav Zilla Parishad constituency | कौलव जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी

कौलव जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी

Next

शिरगाव : जिल्हा परिषद निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी असला तरी कौलव मतदारसंघात आतापासून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. इच्छुकांनी संपर्क वाढवण्यासाठी दररोज गावागावात भेट देऊन संपर्क वाढविला आहे.

कौलव जिल्हा परिषद मतदार संघात सध्या काॅंग्रेसचे पांडुरंग भांदीगरे हे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती संजयसिंह कलिकते यांचा पराभव केला होता. याला कारणे सुध्दा भरपूर आहेत. तत्कालिन भोगावती साखर कारखान्याची नोकरभरती यामध्ये स्थानिक पातळीवर पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते सोडून झालेल्या नोकरभरतीचे कारण कलिकते यांचा पराभवास कारणीभूत ठरला. त्यातही एका गटाने कलिकते यांचा पराभव करण्यासाठी घेतलेली अंतर्गत भूमिका ही सुद्धा महत्त्वाची ठरली.

सध्या या मतदारसंघात काॅंग्रेसचे विद्यमान सदस्य पांडुरंग भांदीगरे , काॅंग्रेसचे पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील ( कौलवकर ) , राधानगरी विधानसभा मतदारसंघ तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील शंकरराव पाटील ( कौलवकर ) , घोटवडे येथील युवा नेते व भोगावती साखर कारखान्याचे संचालक धीरज विजयसिंह डोंगळे तसेच त्यांचे चुलते दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक अरुण डोंगळे , भोगावतीचे संचालक व कसबा तारळेचे माजी सरपंच रवींद्र पाटील , बाजार समितीचे माजी संचालक व शिरसे येथील सरपंच सुभाष पाटील हे काॅंग्रेसमधून इच्छुक आहेत. शेकापचे भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील ( कंथेवाडी ) , मोहन पाटील ( आणाजे ) , राष्ट्रवादी काँग्रेस मधून शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील ( तारळे खुर्द ) , भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील ( कसबा तारळे ) , युवा नेते अशोकराव पाटील ( शिरसेकर ) , पंचायत समितीच्या तत्कालिन सभापती दीपाली पाटील यांचे पती दीपक पाटील ( काबळवाडी ) हे इच्छुक आहेत. यामध्ये अपक्ष म्हणून उद्योगपती चंद्रकांतदादा पाटील ( कौलवकर ) हे सुद्धा यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांनी आत्ता जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर करून गावागावात संपर्क वाढविला आहे. त्यामुळे कौलवमधून तीन चार जण इच्छुक आहेत. त्यातील विद्यमान सदस्य पांडुरंग भांदीगरे ( पुंगाव ) , रविश पाटील कौलवकर , सुशील पाटील कौलवकर यांनी तर मतदार संघ आत्तापासूनच पिंजून काढला आहे. तसेच डोंगळे घरातील भाऊबंदकी यानिमित्ताने उफाळून आली आहे. धीरज डोंगळे , अभिषेक डोंगळे या चुलत भावाच्या मध्येही रस्सीखेच सुरू आहे.

एकंदरीत यावेळी मतदार संघ खुला होणार असल्याचे संकेत मिळत असल्यानेच सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व भोगावती माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील ( कौलवकर ) यांनी अद्याप कोणतीही हालचाल केली नाही. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती संजयसिंह कलिकते यांनी सुध्दा कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. दोन नेत्यांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहे. त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे.येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम आहे तसेच शिवसेना , जनता दल ,भाजप , मनसे या पक्षांच्या नेत्यांनी सुध्दा कोणत्याही परिस्थितीत येथून निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढत जाणार आहे.

Web Title: Brotherhood of aspirants in Kaulav Zilla Parishad constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.