कागलमध्ये भाऊबंदकीने डोकेदुखी

By admin | Published: November 16, 2016 12:22 AM2016-11-16T00:22:34+5:302016-11-16T00:22:34+5:30

हसन मुश्रीफ यांच्या भावजय नगराध्यक्षपदाच्या मैदानात : समरजितसिंह घाटगेंचे चुलत भाऊ अखिलेशसिंह यांच्याकडून ११ अपक्षांची मोट

Brothers in Kagal have a headache | कागलमध्ये भाऊबंदकीने डोकेदुखी

कागलमध्ये भाऊबंदकीने डोकेदुखी

Next

 
जहाँगीर शेख ल्ल कागल
कागल पालिकेच्या निवडणुकीत राजकीय भाऊबंदकीही उफाळून आली आहे. आमदार हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांना या निमित्ताने ‘भावकीचा’ सामना करावा लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असलेल्या बिल्कीश अन्वर मुश्रीफ या आ. मुश्रीफ यांच्या भावजयी आहेत, तर पालिका निवडणुकीत पहिल्यांदाच कागल ज्युनिअर घाटगे घराणे सक्रिय झाले असून, समरजितसिंह यांचे चुलत-चुलत भाऊ अखिलेशसिंह मृगेंद्रसिंह घाटगे यांनी ११ अपक्षांची मोट बांधून पॅनेल केले आहे. अखिलेशसिंह घाटगे आणि बिल्कीश मुश्रीफ यांनी प्रचाराचा धडाका लावल्याने कोणाला फटका बसणार, याकडे लक्ष लागले आहे.
कागलच्या ऐतिहासिक जहागिरीचे वारसदार असणारे घाटगे घराणे हे काळाच्या ओघात विस्तारत गेले आहे. करवीरच्या गादीला दत्तक गेलेले यशवंतराव घाटगे म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ बंधू सर पिराजीराव घाटगे हे कागलचे अधिपती होते. त्यांचे पुत्र श्रीमंत जयसिंगराव घाटगे ऊर्फ बाळ महाराज आणि बाळ महाराजांचे पुत्र स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे अशी वंशावळ राजकीयदृष्ट्याही चालत आली. विक्रमसिंहराजेंच्या नंतर राजे गटाची धुरा समरजितसिंह घाटगे समर्थपणे सांभाळीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्यानंतर कागल ज्युनिअर म्हणून ओळखले जाणारे घाटगे घराणेही जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सक्रिय राहिले. स्वर्गीय अजितसिंह यशवंतराव घाटगे यांचे पुत्र मृगेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या पत्नी मृगनयनाराजे यांनी अखिलेशराजे फौंडेशनच्या माध्यमातून समाजकारण सुरू केले. आता मृगेंद्रसिंहराजेंचे पुत्र अखिलेशसिंह हे या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात सक्रिय झाले आहेत. भाजपचे आमदार अमल महाडिक हे अखिलेशसिंह घाटगेंचे दाजी आहेत. ज्युनिअर घाटगेंनी सार्वजनिक ठिकाणी भाऊबंदकीवर भाष्य केलेले नाही. मात्र, आपलेही राजकीय, सामाजिक अस्तित्व दाखविण्याची संधी यापुढे सोडायची नाही, हा इरादा स्पष्ट केला आहे.
घाटगे घराण्यात अशी दोन घराणी सक्रिय झाली असताना नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या बिल्कीश अन्वर मुश्रीफ यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना स्वत:च्या घरातूनच ‘हादरा’ दिला आहे. कागल शहरात मुश्रीफ घराणे सुरुवातीपासूनच लोकप्रिय आहे. कागलचे पहिले उपनगराध्यक्ष हा बहुमान मिळविणारे कै. मियालाल मुश्रीफ यांना शमशुद्दीन (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ), आ. हसन मुश्रीफ आणि अन्वर असे तीन सुपुत्र आहेत. शेंडेफळ असणारे अन्वर मुश्रीफ यांनी नगरसेवक म्हणून यापूर्वी काम केले आहे, तर बिल्कीश मुश्रीफ या आमदार मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासात
कुटुंबातील एक सदस्य म्हणून आघाडीवर राहिल्या आहेत. त्यांचे पुत्र नवाज मुश्रीफ हे पाच वर्षांपूर्वी नगरसेवकपदासाठी इच्छुक होते. आता ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने भावजयी बिल्कीश यांनी आ. मुश्रीफ यांच्याकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली. मात्र, पुढील पाच वर्षे होणारी राजकीय कोंडी लक्षात घेऊन आ. मुश्रीफांनी उमेदवारीस नकार दिल्याने शेवटी बिल्कीश यांनी ही बंडखोरी केली आहे. आमदार मुश्रीफ यांची भावजय हीच जरी
त्यांची ओळख असली, तरी बिल्कीशचाची म्हणून त्या बऱ्यापैकी परिचित आहेत.
विशेष म्हणजे, ही ज्युनिअर मंडळी किती मते घेतील, गोळा करतील, त्याचा कोणाला लाभ-तोटा होईल हे निवडणुकीत स्पष्ट होईलच; पण त्यापेक्षा पुढच्या राजकारणातही ‘उपद्रवी’ ठरू लागतील काय? हा खरा सीनिअरांच्या म्हणजे थोरली पाती असलेल्या आ. मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यापुढचा चिंतनाचा विषय ठरणार आहे.
एकीकडे कागल सीनिअरांप्रमाणे राजकीय वर्चस्वाचे स्वप्न कागल ज्युनिअर पाहत असताना मुश्रीफांच्या घरातही धाकटी पाती म्हणजे ‘ज्युनिअर’ बंडखोरीवर उतरल्याने कागलमध्ये हे राजकीय भाऊबंदकीचे नाट्य जोरात रंगणार आहे.

Web Title: Brothers in Kagal have a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.