ब्रुसेल्स : पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या आवश्यक - संभाजीराजे, ब्रुसेल्समधील परिषदेत मांडले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:39 PM2018-09-28T17:39:06+5:302018-09-28T17:43:11+5:30
बदलत्या हवामानामुळे स्थलांतर होते यावर आता जगभरात एकमत होत आहे. मात्र पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
ब्रुसेल्स : बदलत्या हवामानामुळे स्थलांतर होते यावर आता जगभरात एकमत होत आहे. मात्र पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
ब्रुसेल्स येथे आयोजित दहाव्या आशिया युरोप संसदीय सहयोग बैठकीमध्ये भारताच्यावतीने संभाजीराजे यांनी हे मत व्यक्त केले. दोन दिवसांच्या या परिषदेसाठी भारतातर्फे तीन खासदारांना पाठवण्यात आले असून यामध्ये संभाजीराजे यांचा समावेश आहे.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, १९९० मध्ये हवामान बदलावरील आंतरसरकारीय मंडळाने (आयपीसीसी) तयार केलेलेल्या समीक्षणात्मक अहवालात प्रथम हवामान बदलामुळे होणा-या विस्थापनाचा मुद्दा मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या विविध पैलूंवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिकडेच चर्चा झाली. या चर्चेदरम्यान हवामान बदलामुळे होणारे स्थलांतर या मुद्यावर अधिक गांभिर्याने चर्चा झाली आहे.
ते म्हणाले की स्थलांतर ही जागतिक अर्थव्यवस्थेतील एक स्वयंप्रेरित अशी एक प्रक्रिया आहे, आणि ती या अर्थव्यवस्थेचा एक अभिन्न भाग आहे. अनेक व्यावसायिक, कामगार, व्यापारी, विद्यार्थी विविध कारणांसाठी स्थलांतर करत असतात. अचानक येणा-या नैसर्गिक आपत्ती या हवामान बदलाच्या हळूहळू होणा-या परिणामांपासून वेगळ्या केल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे यावर संभाजीराजे यांनी भर दिला. नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या स्थलांतराकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट आॅन मायग्रेशन’ या विषयावरील मसुदाही अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.