कोल्हापुरातील उचगावात कामगाराचा निर्घृण खून, बघ्यांची मोठी गर्दी; खुनाचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:16 PM2023-04-20T12:16:06+5:302023-04-20T12:16:50+5:30
घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते
मोहन सातपुते
उचगाव: उचगाव (ता. करवीर) येथील कृषी महाविद्यालयच्या परिसरातील शेतवडीत एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात करण्यात आला. गणेश नामदेव संकपाळ (वय -४७, गणेश कॉलनी, उचगाव) असे मृताचे नाव आहे.
ही घटना आज, गुरुवार सकाळी फिरायला गेलेल्या लोकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिल्याने उघडकीस आली. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मिळालेल्या साहित्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणेश संकपाळ हे येथील उचगाव-गडमुडशिंगी रोडवरील एका फर्णीचर मॉल मध्ये कामाला होते. उचगाव कृषी महाविद्यालयाच्या शेतवडीत त्याचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान या परिसरात उघड्या माळरानावर रात्री बेरात्री ओपन बार पद्धतीने काही युवक दारु पित बसलेले असतात. तर उघड्या व ओसाड कॉटरसमद्ये तृतीयपंथी उभे असतात. यामुळे खूनाचे नेमके कारण काय याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
घटनास्थळी करवीर उप विभागीय पोलिस अधीक्षक संकेत गोसावी, गुन्हे अन्वेषण विभाग, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, श्वान पथक टीमला पाचारण करण्यात आले होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता.