दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट; कोल्हापुरात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:48 AM2023-01-19T11:48:02+5:302023-01-19T11:56:35+5:30
मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून ओळख पटली
उद्धव गोडसे
कोल्हापूर: महानगरपालिकेच्या हद्दीतील जगतापनगर येथे जोतिर्लिंग शाळेजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना आज, गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. फुलेवाडी, पाचवा बसस्टॉप, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अद्याप खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही शालेय मुले मैदानावर खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल ओढ्याकडे गेला. त्यानंतर बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना एक मृतदेह आढळला. जवळच राहणा-या एका महिलेने शाळेकडे पळणा-या मुलांना विचारणा केल्यानंतर खुनाच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी करवीर पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली.
ऋषिकेश याचा बुधवारी रात्री उशिरा जगतापनगरातील ओढ्यानजिक दोन ते तीन तरुणांशी वाद झाला असावा. झटापटीनंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड पडला होता. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मित्रांकडूनच खून झाल्याचा संशय
मृत ऋषिकेश सूर्यवंशी हा बुधवारी रात्री मित्रांसोबत जगतापनगर परिसरात जेवणासाठी गेला असावा. त्यावेळी काही कारणांवरून मित्रांमध्ये वाद होऊन त्याचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून, संशयिताचा शोध घेतला जात आहे.