‘बीएसएनएल’कडून ४४४ टॉवरवरून थ्रीजी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:07 AM2018-11-30T00:07:12+5:302018-11-30T00:07:16+5:30

भारतीय दूरसंचार निगमने आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत अनेक महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. याबाबत ‘बीएसएनएल’चे कोल्हापूर विभागाचे महाप्रबंधक एस. ...

 BSNL's 3G service from 444 towers | ‘बीएसएनएल’कडून ४४४ टॉवरवरून थ्रीजी सेवा

‘बीएसएनएल’कडून ४४४ टॉवरवरून थ्रीजी सेवा

googlenewsNext

भारतीय दूरसंचार निगमने आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत अनेक महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. याबाबत ‘बीएसएनएल’चे कोल्हापूर विभागाचे महाप्रबंधक एस. के. चौधरी यांच्याशी साधलेला ‘थेट संवाद.’
प्रश्न : स्पर्धेत टिकण्यासाठी ‘बीएसएनएल’कडून काय योजना सुरू आहेत ?
उत्तर : दूरसंचार क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे ही वस्तुस्थिती आहे; परंतु या स्पर्धेत सक्षमपणे टिकण्यासाठी ‘बीएसएनएल’ने आता पावले उचलली आहेत. बीएसएनएलच्या मोबाईलधारकांची संख्या वाढत असल्याने त्यांना चांगली सुविधा देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करीत आहोत. या योजना अमलात आणल्यानंतर सर्वच ग्राहकांना आणखी दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
प्रश्न : मोबाईल सेवा प्रभावी होण्यासाठी काय पावले उचलली आहेत?
उत्तर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही थ्री-जीचे १३१ नवीन टॉवर उभारत आहोत. यातील २५ टॉवर उभारले आहेत. सध्या जिल्ह्यात थ्री-जीचे ३१३ टॉवर आहेत. त्यांपैकी १५० टॉवर हे नोकिया तंत्रज्ञानानुसार तर १०४ टॉवर अल्फाटेन या फ्रान्सच्या तंत्रानुसार थ्री-जीमध्ये रूपांतरीत करीत आहोत. उरलेले टॉवर टू-जीच राहणार आहेत.
प्रश्न : वाय-फाय स्पॉट देण्याबाबत आपली काय योजना आहे?
उत्तर : आमच्याकडे याआधी दोन लाखांहून अधिक लॅँडलाईन कनेक्शन्स होती. मात्र, मोबाईलच्या वापरामुळे ही संख्या ६४ हजारांवर आली आहे. त्यामुळे २० पेक्षा अधिक कनेक्शन्स असलेली एक्स्चेंज बंद करण्याचा निर्णय ‘बीएसएनएल’ने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २९२ एक्स्चेंजपैकी ५० एक्स्चेंज बंद होणार आहेत. त्यामुळे उर्वरित २४२ ठिकाणी आम्ही ‘वाय-फाय स्पॉट’
सुरू करणार आहोत. या एक्स्चेंजच्या १०० मीटरच्या परिसरामध्ये ‘बीएसएनएल’च्या वाय-फाय सेवेचा ग्राहकांना मोफत वापर करता येईल.
प्रश्न : ‘ब्रॉडबॅँड ओव्हर वाय-फाय’ ही योजना काय आहे?
उत्तर : आमची बहुतेक केबल ही भूमिगत आहे. मात्र, अशी काही ठिकाणे आहेत की तेथे केबल टाकता येत नाही किंवा अतिशय कमी वस्ती असल्याने तिथे केबल जाण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आमच्या टॉवरवर आणि संबंधित ग्राहकाच्या घरावर अ‍ॅँटेना लावून त्याला ब्रॉडबॅँड सेवा दिली जाणार आहे. १२५ ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
प्रश्न : ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅँड सेवा देण्याचे काम कुठपर्यंत आले आहे ?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत नेट’ हा जो उपक्रम जाहीर केला आहे, त्याअंतर्गत करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, गगनबावडा या आठ तालुक्यांमधील ग्रामपंचायतींना ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ या अंतर्गत कनेक्शन्स देण्यात आली आहेत. या आठ तालुक्यांतील ६५० ग्रामपंचायतींना ही सेवा देण्याचे काम पूर्ण झाले असून आजरा, चंदगड, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यांतील हे काम शिल्लक आहे. ते राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींना अतिशय दर्जेदार सेवा मिळणार आहे. गेले सहा महिने आम्ही या आठ तालुक्यांमध्ये मोफत सेवा दिली आहे. तेव्हा आता ग्रामपंचायतींनी आपल्या नावे ब्रॉडबॅँड कनेक्शन्स घेण्यासाठी अर्ज देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
प्रश्न : केबलचालकांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे का?
उत्तर : आम्ही जिल्ह्यामध्ये जे केबलचालक आहेत, त्यांच्याशी संपर्क सुरू केला आहे. त्यांच्याकडून ‘बीएसएनएल’च्या ज्या काही सोयी आणि सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे, त्या पोहोचविण्यासाठी त्यांचीही मदत घेतली जाणार आहे.
प्रश्न : बीएसएनएल मोबाईलच्या रेंजबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत; याबाबत काय सांगाल?
उत्तर : ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेऊनच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थ्री-जी टॉवर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हे सर्व टॉवर उभे राहिल्यानंतर रेंजबाबत कुठेही अडचण येणार नाही. उलट कोल्हापूर जिल्ह्यात इतर कंपन्यांच्या तुलनेत पूर्ण जिल्हाभर ‘बीएसएनएल’ची पूर्ण रेंज मिळेल; तसेच डाटा सर्व्हिसमध्येही लक्षणीय सुधारणा होणार आहे.
- समीर देशपांडे

Web Title:  BSNL's 3G service from 444 towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.