बुद्धशिल्पाचे आज लोकार्पण
By admin | Published: September 12, 2015 11:49 PM2015-09-12T23:49:38+5:302015-09-12T23:49:38+5:30
सदरबाझार येथे कार्यक्रम : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बुद्धशिल्प
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या बुद्धशिल्पाचे अनावरण आज, रविवारी सायंकाळी सदर बाजार येथे होत आहे. सुमारे तेरा हजार चौरस फूट अशा भव्य प्रांगणात हे बुद्धशिल्प तसेच सांस्कृतिक हॉल व पंचशील भवन उभारण्यात आले आहे. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या भव्य शिल्पाची उभारणी स्थानिक मूर्तिकारांनी केली आहे.
सदर बाजार परिसरात सदर बाजार हौसिंग सोसायटीची आठ हजार चौरस फूट तसेच महानगरपालिकेची पाच हजार चौरस फूट जागा आहे. गेली अनेक वर्षे ही जागा दलदलीची होती. शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव यांच्या प्रयत्नामुळे ही जागा विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. एक सुसज्ज सांस्कृतिक हॉल, पंचशील भवन आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच बुद्धशिल्प उभारण्याचे संकल्पचित्र तयार केले. जिल्हा नियोजन समिती व महापालिका फंडातून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून बुद्धशिल्प साकारले. पुढच्या टप्प्यात सुंदर उद्यानही तयार केले जाणार आहे.
रविवारी महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बुद्धशिल्पाचे लोकार्पण होणार असून, उपमहापौर जोत्स्ना पवार-मेढे, स्थायी सभापती सर्जेराव पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, तुकाराम तेरदाळकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)