शोषण व्यवस्थेला रोखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज --: श्रीमंत कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:55 PM2019-11-26T14:55:29+5:302019-11-26T14:56:40+5:30
तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : अंधश्रद्धा वाढल्यानंतर चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्येत भर पडत जाते. यातून शोषण व्यवस्थेला खतपाणी घातले जाते. अशा वाढत्या शोषणव्यवस्थेला जर वेळीच रोखायचे असेल, तर बुद्धांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी केले.
धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दुस-या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांची निवड झाली आहे. शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये सोमवारी निवडीबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल म्हमाने होते. संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर, विमल पोखणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोकाटे म्हणाले, ‘गौतम बुद्ध ही सामान्य व्यक्ती नसून, जगाचा महामानव, रिअल हिरो आहे. जगात जात, वंश, धर्म यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष रोखायचा असेल, तसेच जगाचा नाश होण्यापासून वाचवायचे असेल, तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.
निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे. तसेच विशिष्ट शक्तींना रोखण्यासाठी विचारवंतांसोबत राहणे रस्त्यावरील कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. यावेळी हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मिती विचारमंचच्या संवाद प्रकाशनच्या वतीने प्रा. कपिल राजहंस लिखित ‘भीमा-कोरेगाव आणि इतर संकीर्ण लेख’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी दशरथ माने, प्रवीण पाटील, चैतल पाटील, प्रबुद्ध कांबळे, मानसिंग देसाई, बाबा महाडिक, सागर भोसले उपस्थित होते.
----------------------------
कोल्हापूरकरांचे एकदा ठरले की ठरले
कोल्हापूरकरांनी राज्यातच नव्हे, तर देशात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे एकदा ‘ठरले की ठरले’; त्यासाठी ते काहीही करतात, असे कोकाटे यांनी आवर्जून सांगितले.