निवडणुकींच्या तयारीचा अर्थसंकल्प

By admin | Published: February 2, 2017 01:05 AM2017-02-02T01:05:49+5:302017-02-02T01:05:49+5:30

जे. एफ. पाटील : कोल्हापूर चेंबर-प्रेस क्लबतर्फे चर्चासत्र; तज्ज्ञांनी मांडले विचार

Budget preparation preparations | निवडणुकींच्या तयारीचा अर्थसंकल्प

निवडणुकींच्या तयारीचा अर्थसंकल्प

Next

कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पातील खर्चाच्या रचनेत शेती, ग्रामीण आणि पायाभूत सुविधांना कमाल महत्त्व दिले आहे. विकास, रोजगारपूरक, समन्यायी स्वरूपातील या वर्षीचा अर्थसंकल्प भविष्यातील निवडणुकींची तयारी करणारा आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या चर्चासत्रात ते बोलत होते. चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयातील चर्चासत्रास शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय ककडे, चार्टर्ड अकौंटंट महेश धर्माधिकारी, कर सल्लागार आर. आर. दोशी, औद्योगिक सल्लागार नरेंद्र माटे यांनी विचार मांडले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, कृषिक्षेत्राबाबतची अर्थसंकल्पातील गुंतवणूक ‘जीडीपी’ वाढीला बळ देईल. मायक्रो इरिगेशन, डेअरी प्रोसेसिंग फंड, रेल्वे तिकीट, शाळा-महाविद्यालयांचे आॅनलाईन शुल्क भरणे, कौशल्य विकास केंद्रे रोजगार निर्मितीला बळ देणारा आहे. गुंतवणूक वाढ, बचतीला प्रोत्साहन, विषमता कमी करण्याचे प्रयत्न, आदी वैशिष्ट्ये असलेल्या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने भविष्यातील निवडणुकींची तयारी केल्याचे दिसते. भाववाढ नियंत्रणाचा अंदाज येत नाही.
प्रा. ककडे म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या चांगल्या तरतुदी सरकारने अर्थसंकल्पात केल्या आहेत. यात कृषी, ग्रामीण विकास, रेल्वेचे व्यापारी तत्त्वावर सक्षमीकरणाचे नियोजन केल्याचे दिसते. हा अर्थसंकल्प शिस्त पाळणारा, बाजारपेठा व उद्योगक्षेत्राला सकारात्मक दिशा देणारा आहे. किमान उत्पन्न देण्याचा प्रयत्न म्हणून युनिव्हर्सल बेसिक इन्कम (यूबीआय) योजनेचा विचार मांडला आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्यातीच्या नव्या क्षेत्रांचा शोध, कौशल्य विकासासाठी आॅनलाईन अभ्यासक्रम राबविणे आवश्यक आहे.
नरेंद्र माटे म्हणाले, अर्थसंकल्पात कृषी, सिंचन व्यवस्था, शेती अवजारे, एमएसईबी, डेअरी डेव्हलपमेंट, रेल्वे स्टेशनवरील अ‍ॅक्सिलरेटर, आदी सुविधा, लेदर अँड फूटवेअरमधील रोजगार निर्मितीसाठी, कौशल्य उपक्रमासाठी कोट्यवधीची तरतूद केली आहे. त्यातील संधी लक्षात घेऊन काम केल्यास कोल्हापूरच्या उद्योग, औद्योगिक क्षेत्राला निश्चितपणे ‘अच्छे दिन’ येतील.
आर. आर. दोशी म्हणाले, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. सरकारने डिजिटल व्यवहारांच्या दिशेने टाकलेल्या पावलांना साथ देणे आवश्यक आहे. चार्टर्ड अकौंटंट धर्माधिकारी म्हणाले, भविष्यातील नियोजन व योजनांवर आधारित अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कराच्या टक्केवारीतील घट, मेडिक्लेमची वाढविलेली मर्यादा, कंपन्यांना ५० कोटींपर्यंत आयकर सवलत, कॅपिटल गेन टॅक्स लायेबल होण्याची दोन वर्षांवर आणलेली मुदत हा निर्णय चांगला आहे.
या चर्चासत्रास ‘सीआयआय’चे माजी अध्यक्ष मोहन घाटगे, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, एन. ए. कुलकर्णी, शिवाजीराव पोवार, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, आदी उपस्थित होते. ‘चेंबर’चे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष आनंद माने यांनी अर्थसंकल्प दिसायला चांगला असला, तरी त्याचे वास्तविक परिणाम भविष्यात दिसून येतील. हा अर्थसंकल्प मागील दोन अर्थसंकल्पांची कार्बन कॉपी असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. मानद सचिव हरिभाई पटेल यांनी सूत्रसंचालन केले.
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, नोटाबंदीचा फटका सर्वाधिक कृषी क्षेत्राला बसला; त्यामुळे कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतुदी केल्याचे दिसते. साखर उद्योगासाठी काहीच नाही. ‘यूबीआय’ ही बेरोजगारिता वाढविण्याबाबतची धोक्याची घंटा आहे. अर्थसंकल्पाला निवडणुकीची मर्यादा आहे.

कोल्हापुरात बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोहन घाटगे, आनंद माने, विश्वास पाटील, प्रा. डॉ. विजय ककडे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

Web Title: Budget preparation preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.