आश्चर्यकारक! म्हशीनं दिला आठ पाय, पाच कानाच्या रेडकाला जन्म, कोल्हापुरातील 'या' गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:39 PM2022-02-07T16:39:04+5:302022-02-07T16:56:00+5:30
शस्त्रक्रियेनंतर म्हशीची प्रकृती स्थिर
गौरव सांगावकर
राधानगरी : म्हशीनं असो वा गायीने दोन तोंडाचं, पाच पायाचं रेडकू किंवा वासरला जन्म दिल्याचे आपण बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा बघितलं देखील असेल. मात्र, कोल्हापुरात एका म्हशीनं आश्चर्यकारकच रेडकाला जन्म दिलाय. हे रेडकू दोन तोंडाच किंवा पाच पायाचं नाही तर या रेडकाला आहेत चक्क आठ पाय अन् पाच कान.
ऐकून जरा आश्चर्य वाटलं ना? पण ही काही खोटी नाही तर खरी घटना आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील बनाचिवाडीत एका म्हशीनं या आश्चर्यकारक रेडकाला जन्म दिला. मात्र दुर्देवाने या रेडकाचा मृत्यू झाला आहे.
बनाचिवाडी या गावामध्ये शंकर गोविंद काशीद हे शेतकरी राहतात. त्यांच्या म्हशीला हे आठ पाय आणि पाच कान पण तोंड एकच असणाऱ्या रेडकू झाले. राधानगरी भागातील हा पहिलाच प्रकार असून आहे. सिजर करून या रेडकाला जन्म देण्यात आला. या शस्त्रक्रियेला दोन तासाहून अधिक वेळ लागला. मात्र, दुर्देवाने रेडकाचा मृत्यू झाला.
रेडकाचा मृत्यू झाला असला तरी, म्हशीची प्रकृती ठीक आहे. या वेळी घटनास्थळी भोगावती सेंटरचे पशु अधिकारी भाऊसाहेब पवार व राधानगरी गोकुळ सेंटरचे डॉ. डांगे होते. तसेच पशुधन परीवेक्षक सचिन कांबळे व दीपक भांदीगरे. गाडी चालक संदीप कांबळे यांचे सहकार्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर म्हशीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
आत्ता पर्यंत गोकुळमध्ये केलेल्या सेवेमध्ये पहिल्याच अशा प्रकारचा अनुभव आला. गर्भ धारणेमध्ये रेडकू तयार होतानाच अनियमित प्रमाणात हे अवयव तयार होतात. - डॉ. भाऊसाहेब पवार. वैद्यकीय अधिकारी भोगावती सेंटर