म्हशींचा रॅम्पवॉक
By admin | Published: November 13, 2015 11:07 PM2015-11-13T23:07:31+5:302015-11-13T23:44:38+5:30
अनोखा रोड शो : सातशेहून अधिक म्हशींचा सहभाग
कोल्हापूर : म्हशींच्या अंगावरील केसांवर केलेले कोरीव काम, शिंगे रंगवून त्यांवर रिबिनी, फुगे, मोरपिसे बांधून सजविलेल्या म्हशी आणि मालकांच्या हाकेसरशी मोटारसायकलमागे धावणाऱ्या म्हशींचा अनोखा ‘रोड शो’ पाहण्यासाठी सागरमाळ येथे शुक्रवारी सायंकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. निमित्त होते सागरोबा देवाच्या दर्शनाचे.
शहरातील विविध भागांतून आलेल्या दुग्ध व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासूनच सम्राटनगर येथील सागरमाळावरील सागरोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव, कळंबा, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, गवळी गल्ली, दौलतनगर, रंकाळा टॉवर या कोल्हापुरातील दुग्ध व्यावसायिकांबरोबरच बेळगाव, सांगली, मिरज येथीलही दुग्ध व्यावसायिक या अनोख्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. सागरोबाच्या दर्शनानंतर येथे आयोजित म्हशींचा अनोखा रोड शो पाहण्यासाठी नगारिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मालकांच्या मोटारसायकलच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर किंवा मालकांच्या एका हाकेवर धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जो तो आपल्या मोबाईलवर त्यांची छबी घेण्यासाठी धडपडत होता. काहीजणांनी मागील दोन पायांवर उभ्या राहणाऱ्या रेड्यांच्या अनोखी कसरती करून दाखवून उपस्थितांना आचंबित केले. शहरासह ग्रामीण परिसरातील सुमारे सातशेहून अधिक म्हशींचा या रोड शोमध्ये सहभाग होता.
कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुग्ध व्यवसाय संघटनेच्या वतीने प्रत्येक म्हैसमालकाचा यावेळी पानविडा व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक उमेश पवार, विलास वास्कर, उद्योजक चंद्रकांत जाधव, संघटनेचे विलास केसरकर, विजय चौगुले, राजू करंबे, हरिभाऊ पायमल, गोगा पसारे, नंदकुमार गवळी, राजू खाडे, आदी यावेळी उपस्थित होते.
पाडव्यानिमित्त गवळी गल्लीत रोड शो
शनिवार पेठ येथील गवळी गल्लीत दीपावली पाडव्यानिमित्त ही गुरुवारी (दि. १२) म्हशींच्या अनोख्या सजावटीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रेडा उधळला
म्हशी, रेडे रोड शोदरम्यान वेगाने धावत होते. त्यामुळे त्यांना जवळून पाहण्यासाठी काही अतिउत्साही नागरिक समोरून येत होते. त्यामुळे अनेकदा रेडा उधळून मारण्यासाठी धावत होता. हा थरारक प्रकार सातत्याने अनेकदा सुरू होता. त्यामुळे अनेकांना किरकोळ जखमीही व्हावे लागले.
अशी आहे प्रथा....
दरवर्षी दिवाळी भाऊबीजेदिवशी म्हैसधारक आपल्या म्हशींना सजवून सम्राटनगर येथील सागरोबा देवाचे दर्शन घेऊन देवाला अभिषेक घालतात. या दर्शनानंतर वर्षभर म्हशी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी जुनी परंपरा आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांतील म्हैसमालक आपल्या म्हशी या ठिकाणी घेऊन येतात.