ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम करा बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:24+5:302021-02-25T04:32:24+5:30
ग्रामीण भागातील बांधकामांना येणार गती लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे ...
ग्रामीण भागातील बांधकामांना येणार गती
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही. नगर विकास खात्याने तशी अधिसूचना बुधवारी प्रसिद्धीस दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे.
ग्रामीण भागात बांधकाम करताना ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्थरावर बांधकाम परवाना दिला जात होता. तथापि, या निर्णयामुळे खूप वेळ जात होता. बांधकाम रखडत होते, शिवाय बेकायदेशीर बांधकामेही वाढत होती. या सर्व अडचणींमुळे ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही अटी, शर्तींशिवाय परवाना काढण्याच्या कटकटीतून सुटका करावी अशी मागणी होत होती. याची दखल घेत डिसेंबरमध्ये नगर विकास विभागाने परवानगीची मर्यादा शिथिल केली होती. पण, त्याचे अंमलबजावणीचे आदेश काढले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून गावपातळीवर मोठी संभ्रमावस्था होती. बुधवारी याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव लहुराज माळी यांनी रत्नागिरी वगळता सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून १५० व ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बांधकामांना आता चांगले दिवस येणार आहेत. नागरी भागालगतच्या बांधकामांना याचा चांगला फायदा होणार आहे.