जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ उभारू
By admin | Published: March 1, 2017 12:35 AM2017-03-01T00:35:02+5:302017-03-01T00:35:02+5:30
संजय घोडावत : उद्योगातून १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार देण्यात आला
कोल्हापूर / जयसिंगपूर : ‘घोडे की नाल दरवाजे पे लगाने से कभी सक्सेस नहीं मिलता, घोडे की नाल पाव मे लगाने से ही सक्सेस मिलता है’. माणसाचे कष्ट त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचविते. यश मिळविण्यासाठी दुसरा कोणताही शॉर्टकट नाही,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी त्यांच्या ५२ व्या वाढदिवसाच्या मनोगतामध्ये केले.
उद्योगपती घोडावत म्हणाले, सन १९९२ ला मी सुरू केलेल्या छोट्याशा उद्योगातून आज जवळपास १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार मिळाला. १२ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना आज शिक्षण देण्याचे काम संजय घोडावत इन्स्टिट्यूट करत आहे. खरंच आज या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. इथे काम करणारा प्रत्येक जण आपले समजून पूर्ण तन्मयतेने झोकून देऊन कष्ट करतो, हे यशाचेच प्रतीक आहे. सकारात्मक विचार करा व प्रत्येक गोष्टीमध्ये सांघिक विचारशैली असणे गरजेचे आहे. मी आज ज्यांच्यावर विश्वास टाकला ते म्हणजे संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, सिव्हील विभागाचे प्रमुख वाय. डी. लोहाणा, संचालक डॉ. व्ही. ए. रायकर, प्राचार्य विराट गिरी, प्राचार्या मोहंती, वासू, जयाकुमारी यांनी आपल्या कामांतून तो सार्थ ठरविला आहे. लवकरच याठिकाणी विद्यापीठ स्थापित करून जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये समावेश करण्याचा आमचा निश्चय आहे. यावेळी ५२ व्या वर्षी पायलट बनल्याबद्दल उद्योगपती घोडावत यांनी आनंद व्यक्त केला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमास चित्रपट अभिनेते सैफ अली खान प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते एसजीआयच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अभिनेते सैफ अली खान म्हणाले, शिक्षणच माणसाला समृद्ध बनविते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात जास्तीत जास्त पुस्तके वाचा. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, दानचंदजी घोडावत, नीता घोडावत, संस्थेचे सचिव श्रेणिक घोडावत, विश्वस्त विनायक भोसले उपस्थित होते. संचालक डॉ. व्ही. ए. रायकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. फ्रँकी डिसुझा यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांचा गौरव
या कार्यक्रमात अभिनेते सैफ अली खान यांच्या हस्ते इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एमबीएमधून तीन विद्यार्थ्यांना ‘बेस्ट आऊटगोर्इंग स्टुडंटस्’ आणि उत्कृष्ट खेळाडूंना ‘बेस्ट प्लेयर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.