गैबी घाटात डोंगराला संरक्षक भिंत बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:11+5:302021-06-02T04:20:11+5:30
सोळांकुर/ वार्ताहर निपाणी-राधानगरी राज्य महामार्गावर सोळांकुर लगतच्या गैबी घाटात रस्त्याकडेला असलेल्या डोंगराची संरक्षक भिंत तसेच सोळांकुर ते नरतवडे ...
सोळांकुर/ वार्ताहर
निपाणी-राधानगरी राज्य महामार्गावर सोळांकुर लगतच्या गैबी घाटात रस्त्याकडेला असलेल्या डोंगराची संरक्षक भिंत तसेच सोळांकुर ते नरतवडे व राधानगरी ते न्यू करंजेपर्यंतच्या रस्त्याचे काम १५ जूनपर्यंत सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिला. मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना दिले आहे.
सध्या या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून, हे काम करणाऱ्या कंपनीने रस्ता रुंदीकरणासाठी धोकादायकरीत्या उत्खनन केले आहे. त्यामुळे डोंगराला काही ठिकाणी ५० मीटर लांबीच्या भेगा पडलेल्या असून, याठिकाणी केव्हाही दरड कोसळून अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन पावसाळ्यांत या घाटात सतत दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या.
सध्या या मार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते, तसेच शेतकरी वर्गाची नेहमी याठिकाणी ये-जा सुरू असते.
पावसाळ्याच्या तोंडावर जर भेग पडलेला भराव नाही काढला तर हा भराव रस्त्यावर येऊन अनर्थ घडण्याची व वाहतूकही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. डोंगराचा भेग पडलेला भराव काढून घेऊन संरक्षक भिंत बांधावी व होणारा अनर्थ टाळावा.
सोळांकुर ते नरतवडे तसेच राधानगरी ते न्यू करंजेदरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डी उखडल्याने या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागते. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे; अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.