इमारत उभारली, पदांची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:28+5:302021-02-25T04:31:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने एक साकल्यपूर्ण संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव २०१३ साली मंजूर केला. त्यानुसार आता राष्ट्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने एक साकल्यपूर्ण संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव २०१३ साली मंजूर केला. त्यानुसार आता राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच पोस्ट कार्यालयाशेजारी या संग्रहालयाची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. आता ही इमारत पूर्ण होऊन त्याठिकाणी संग्रहालय कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आहे. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये विद्यापीठासाठी ५० कोटी देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची पूर्तता अद्यापही बाकी आहे. त्यातील केवळ पाच कोटीच मिळाले आहेत.
शिवाजी विद्यापीठाने संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने याआधीच पावले टाकली होती. साहित्यिक वि. स. खांडेकरांची स्मृती सदैव तेवत राहावी, यासाठी ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय’ची स्थापना २००५ साली करण्यात आली. यानंतरच्या टप्प्यात राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील लोकजीवनाचे दर्शन घडविण्यासाठी शाहू संशोधन केंद्रातर्फे ‘शाहू लोकजीवन वस्तू संग्रहालय’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शस्त्रे, भांडी, कपडे, चामड्याच्या वस्तू, छायाचित्रे, रंगचित्रे इत्यादी दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्यात आला. मराठा इतिहास संशोधन केंद्राबरोबरच इतिहास विभागात मराठेकालीन रंगचित्रे, जुनी नाणी, कागदपत्रे यांचा संग्रह करण्यात आला. विद्यापीठातील तीनही संग्रहालयांची निगराणी, देखभाल, व्यवस्थापन आणि सुरक्षितता यासाठी निरनिराळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने या तीनही संग्रहालयांचे एकच वस्तू संग्रहालय संकुल आणि त्याला संशोधनाची जोड देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्यावतीने सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून सादर करण्यात आला होता. त्याला दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली. यासाठी अडीच कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. यामधून आता इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरीही संग्रहालय विकसित करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळण्याची आता प्रतीक्षा आहे.
चौकट
संग्रहालय उभारणी लांबणीवर
सुवर्ण महोत्सवी वर्षात २०१२ साली जो प्रस्ताव सादर करण्यात आला होता, तेव्हा रिक्त पदांची भरती करण्याचीही मागणी करण्यात आली होती. यामध्ये शाहू संशोधन केंद्रासाठी ५ पदे तर संग्रहालयासाठी ४ पदांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये एक क्युरेटर, दोन गॅलरी असिस्टंट आणि एक शिपाई या पदांचा समावेश होता. मात्र, अजूनही ही पदे मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे संग्रहालयाची उभारणी अजूनही लांबण्याचीच चिन्हे आहेत.
कोट
शाहूकालीन लोकजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू आम्ही जपून ठेवल्या आहेत. आता इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, यासाठीच्या पदांना अजूनही मान्यता आलेली नाही. ही मान्यता आल्यानंतर हे संग्रहालय साकारता येणे शक्य आहे. विद्यापीठाच्या पातळीवर यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतर एक उत्तम संग्रहालय आम्ही उभे करू.
- डॉ. जयसिंगराव पवार, संचालक, राजर्षी शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ.
फोटो (२४०२२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ म्युझियम ०३) : शिवाजी विद्यापीठाने वस्तू संग्रहालय संकुलाची इमारत उभारली आहे. मात्र, त्यातील अंतर्गत कामे निधीअभावी अद्याप पूर्ण झालेली नाहीत.