जयसिंगपूर पालिकेची इमारत इतिहास जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:44+5:302021-04-26T04:21:44+5:30
जयसिंगपूर : येथील नगरपालिकेची संस्थानकालीन जुनी इमारत आता इतिहास जमा होणार आहे. नवीन पाच मजली इमारतीसाठी सत्ताधारी शाहू आघाडीच्या ...
जयसिंगपूर : येथील नगरपालिकेची संस्थानकालीन जुनी इमारत आता इतिहास जमा होणार आहे. नवीन पाच मजली इमारतीसाठी सत्ताधारी शाहू आघाडीच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच नव्या इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, पालिकेचे प्रशासकीय काम आज सोमवारपासून सिद्धेश्वर मंदिराजवळील यात्री निवासमध्ये सुरू होणार आहे.
शताब्दी वर्ष पूर्ण केलेल्या जयसिंगपूर शहरातील नगरपालिकेची १ एप्रिल १९४२ साली स्थापना झाली. व्यापारी पेठेमुळे जयसिंगपूरचा नावलौकिक आहे. या शहराने सामाजिक शांतता आणि सर्वधर्मियांच्या सलोख्याचा संदेश सर्वदूर दिला आहे. पालिकेच्या जुन्या इमारतीला जवळपास ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपालिकेला सुसज्ज इमारत असावी, या दृष्टिकोनातून सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने शासनाकडे इमारत बांधकामाचा प्रस्ताव दिला होता. जवळपास १० कोटी रुपयांचा निधी नवीन इमारतीसाठी मंजूर झाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
दुकानगाळे, पालिका विभागासाठी स्वतंत्र कक्ष, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कक्षाबरोबरच अपंगांसाठी रॅम्प शिवाय दोन लिफ्टदेखील असणार आहेत. सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहे. दरम्यान, नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाल्यामुळे प्रशासकीय कामकाज सिद्धेश्वर मंदिराजवळील यात्री निवास सभागृहात सुरू होणार आहे.
फोटो - २५०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे यात्री निवासमध्ये नगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे.